बबनराव अवताडे गट काय करणार ?

पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक 2021

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली असून या निवडणुकीसाठी जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि मंगळवेढा तालुक्यातील जेष्ठ नेते बबनराव अवताडे यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. कारण तालुक्यात अवताडे गटाची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली असून बबनराव अवताडे यांचे चिरंजीव सिद्धेश्वर अवताडे यांनी उमेदवारी अर्ज नेला असल्यामुळे ते निवडणुकीत उडी घेतात की काय याविषयी उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया सुरू असून राष्ट्रवादीची उमेदवारी भगीरथ भालके तर भाजपची उमेदवारी समाधान अवताडे यांना मिळणार असल्याचे मानले जात आहे. त्याअनुषंगाने दोन्ही गटांनी प्रचाराला सुरुवात ही केली आहे.

दरम्यान, मंगळवेढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सिद्धेश्वर अवताडे यांनीही उमेदवारी अर्ज नेला आहे. त्यामुळे सिद्धेश्वर अवताडे खरेच उमेदवारी अर्ज दाखल करतात काय याविषयी उत्सुकता लागली आहे. कारण मंगळवेढा तालुक्यात बबनराव अवताडे यांना मानणारा वर्ग मोठा आहे.

2009 च्या निवडणुकीत अखेरच्या क्षणी बबनराव अवताडे यांनीच दिवंगत आमदार भारत भालके यांना मदत केली होती अशी चर्चा नेहमीच चालते. त्यामुळे भालके यांना पहिल्याच निवडणुकीत मंगळवेढा तालुक्यात मोठे मताधिक्य ही मिळाले होते. त्यानंतर मागील 10 वर्षात अनेकदा कै. भारत भालके आणि बबनराव अवताडे यांची कधी उघड तर कधी छुपी आघाडी दिसून आली आहे.

आजवरचा अनुभव लक्षात घेता वेळोवेळी बबनराव अवताडे यांचे दान भारत भालके यांच्याच पारड्यात पडल्याचे दिसून आले आहे. यावेळच्या पोटनिवडणूकीत बबनराव अवताडे यांच्या गटाची भूमिका काय राहते याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!