पंढरपूरच्या सोशल मीडिया प्रचारात भाजपचे परप्रांतीय कार्यकर्ते


विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा सायबर सेल सक्रिय


पंढरपूर : ईगल आय मीडिया


पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा सायबर सेल सक्रिय झाला असून गेल्या काही दिवसांपासून भाजपचे परप्रांतीय कार्यकर्ते मराठी नावाने फेक फेसबुक अकाऊंट वरून पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ पोस्ट करीत असल्याचे दिसून येते.


पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत आता जोरदार रंगत निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी चे भगीरथ भालके, भाजपचे समाधान अवताडे, अपक्ष सिद्धेश्वर अवताडे, शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, अपक्ष शैला गोडसे यांनी प्रचारासाठी उन्हातान्हात रान पेटवले आहे.


ग्राउंडवर प्रचार तापलेला असतानाच सोशल मीडियावर ही हे रणकंदन सुरू असल्याचे दिसून येते. फेसबुकवर पाहिल्यापासून राष्ट्रवादी चे भगीरथ भालके आघाडीवर होते. त्यांच्या समर्थनार्थ होणारा फेसबुक प्रचार आघाडीवर होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून भाजपचे उमेदवार समाधान अवताडे यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणावर पोस्ट पडत आहेत. पोस्ट, ते टाकणारे फेसबुक युजर्स यांचे फेसबुक प्रोफाईल तपासले असता धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मराठी नावाने असलेले बहुतांश प्रोफाईल परप्रांतीय लोकांची असल्याचे दिसते. नाव मराठी, फोटो महाराष्ट्रीयन व्यक्तीचा मात्र त्याचा पत्ता बेंगळुरू, दिल्ली, मध्यप्रदेश, हरियाणा इकडचा असल्याचे दिसून येते. अवताडे यांच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या अनेकांकडून त्यांचे फेसबुक प्रोफाईल लॉक केले आहेत, त्यामुळे ते कोणत्या भागातील आहेत याची कल्पना येत नाही. मात्र त्यातील बहुतांश सर्वजण परप्रांतीय असल्याचे दिसून येते. भगीरथ भालके यांच्या समर्थनार्थ असलेल्या पोस्ट वर येऊन समाधान अवताडे यांच्या समर्थनार्थ कॉमेंट करणारे बहुतेक लोक परप्रांतीय आहेत असे दिसून आले आहे.


यावरून भाजपने पंढरपूर ची पोटनिवडणुक किती गांभीर्याने घेतली आहे आणि पुढच्या काळात भाजप आणखी कोणत्या स्तराला जाईल याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!