पंढरपूर : ईगल आय मीडिया
श्रीविठ्ठलाच्या आषाढी एकादशी सोहळ्या निमित्त पंढरपूर नगरीत भाविकांची गर्दी होऊ नये. यासाठी ३० जून दुपारी २ ते २ जुलैपर्यंत संचार बंदी कायदा लागू करण्यात येणार आहे. या यासंदर्भात सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवणार असल्याची माहिती अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत आषाढी एकादशीचा सोहळा भरल्यास राज्यभरातील वारकरी पंढरपुरात एकत्र येतील. यामुळे कोरोनाचा अधिक प्रसार होईल. त्यामुळे पंढरपूर नगरीत वारकर्यांची गर्दी होऊ नये. यासाठी पंढरपूर शहर व शहरालगतच्या व ८ गावांमध्ये ४ दिवस संचार बंदी कायदा लागू करण्याचा प्रस्ताव आहे. परंतु शहरातील नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांनी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्याकडे संचार बंदीचा कालावधी कमी करण्याबाबत मागणी केली. नागरिकांची गैरसोय होते. यामुळे संचारबंदी चा कालावधी अडीच दिवसाचा करावा. असे निवेदन यावेळी दिले.
याप्रसंगी नगराध्यक्ष साधना भोसले, नगरपरिषदेच्या आरोग्य समितीचे सभापती विवेक परदेशी, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, कृष्णा वाघमारे, विक्रम शिरसट, संजय निंबाळकर, महादेव भालेराव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, हरीश ताटे, संदीप मांडवे, अरुण कोळी, गणेश अंकुशराव, लखन माने बालाजी डोके उपस्थित होते. याबाबतचा सुधारित प्रस्ताव जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे पाठवणार असल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.