लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी : प्रांताधिकारी ढोले
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेतंर्गत तालुक्यामध्ये शहरातील 96 हजार 238 व ग्रामीण क्षेत्रातील 3 लाख 51 हजार 71 असे एकूण 4 लाख 47 हजार 309 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम 15 सप्टेंबर 2020 पासून केली आहे. या मोहिमेतंर्गत प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील शहरी भागात 17 व ग्रामीण भागात 165 आरोग्य पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक शहरात प्रत्येक वार्डातील दररोज 50 घरांना तर ग्रामीण भागातील प्रत्येक गावांतील दररोज 50 घरांना भेटी देवून कुटुंबातील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करीत आहेत.
नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क घालणे आवश्यक आहे. ताप आल्यास सर्दी, खोकला, धाप लागणे, थकवा येणे अशी लक्षणे आढळून आल्यास तात्काळ आरोग्य तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही, प्रांताधिकारी ढोले यांनी केले आहे.
तपासणी मध्ये घरातील प्रत्येक सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन तसेच कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेवून, ताप, खोकला, दमा, ऑक्सिजन पातळी कमी भरणे अशी कोरोना सदृश्य लक्षणे असणाऱ्या नागरिकांची कोविड 19 ची तपासणी करुन आवश्यक ते वैद्यकीय उपचार केले जात असल्याचे प्रांताधिकारी ढोले यांनी सांगितले.