पंढरपूर शहरात संचारबंदी गरजेची

आडमार्गाने शेकडो वारकरी, पाऊले चालती पंढरीची वाट


पंढरपूर : ईगल आय मीडिया

कोरोनामुळे यंदा आषाढी यात्रा स्थगित केलेली आहे आणि वारकऱ्यांना पंढरीत येऊ नये असे आवाहन केलेले आहे. तरीही शेकडो वारकरी पंढरीच्या वाटेवर चालत येताना दिसत आहेत. जिल्हा नाकाबंदी पास करून हे वारकरी तालुक्याच्या सीमेपर्यंत येत आहेत, अनेकजण सीमा ओलांडून गनिमी काव्याने पंढरीत आल्याचे दिसून येत आहेत. या वारकऱ्यांना पूर्णपणे अटकाव घालणे पोलीस प्रशासनाला अशक्य असल्याचे दिसू लागले आहे. त्यामुळे एकादशी दिवशी पंढरीत बाहेरील भाविक मोठ्या संख्येने आल्याचे दिसले तर आश्चर्य वाटू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यंदाची आषाढी यात्रा तीन दिवसावर येऊन ठेपली आहे, त्यामुळे आषाढी यात्रेसाठी परंपरेनुसार पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांची संख्या आता वाढू लागली आहे. गेल्या चार दिवसापासून पंढरपूर शहराच्या आसपास शेकडो वारकरी एकट्या दुकट्याने पायी चालत आलेले दिसत आहेत. पंढरीत वारकऱ्यांनी येऊ नये याकरिता जिल्हा पोलिसांनी तीन स्तरीय नका बंदी लागू केली असली तरीसुद्धा हे वारकरी आडमार्गाने पंढरीच्या दिशेने कूच करीत असल्याचे दिसून येत आहेत. पंढरपूर शहरातील मठ – मंदिरे यात्रेच्या काळात प्रशासनाने पूर्णपणे कुलूप बंद केलेली असली तरीही, पंढरपूर शहराच्या आसपास शेकडो वारकरी आल्याचे दिसून येतात. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी पंढरीत येऊन वारी पोहोच करण्याचा ‘ इरादा ‘ असलेले अनेक वारकरी एक जुलै रोजी पंढरपुरात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आज पर्यंत पंढरपूर शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले असले तरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने बाहेरून येणाऱ्या वारकऱ्यांमुळे पंढरपूर शहरात कोणाचा प्रसार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्याच्या सर्व सीमा अधिक काटेकोरपणे बंद करण्याची आवश्यकता असून याशिवाय तालुका हद्दीवर असलेली नाका-बंदी आणखी कडक करून, शहरात येणाऱ्या वारकऱ्यांच्या सर्व वाटा बंद करण्याची गरज आहे. 29 जून ते 2 जुलै या काळात पंढरपूर शहरात पूर्णपणे संचारबंदी लागू करणे शहरवासीयांच्या हिताचे आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांकडून आज निर्णय होणे अपेक्षित आहे. अन्यथा मुक्त संचार असलेल्या पंढरपूर शहरात छुप्या मार्गाने आलेले वारकरी शिरकाव करण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. पंढरपूरकरानी आजवर प्रशासनाला अभूतपूर्व सहकार्य करून कोरोना पंढरपूरच्या बाहेर थोपवण्यात यश मिळवले आहे. मात्र पुढील चार ते सहा दिवस पंढरपुरकरांसाठी कसोटीचा काळ आहे. नागरिकांनी स्वतः ला स्वतःहून शहरात फिरण्यास अटकाव करण्याची आवश्यकता आहे. तसेच संचारबंदी लागू केल्यास प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्याचीही पंढरपूर करांची जबाबदारी आहे . अन्यथा आजवर केलेल्या कोरोना प्रतिबंधक प्रयत्नांवर पाणी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आजवर बाहेरून मर्यादित संख्येने आलेल्या लोकांमुळे कोरोनाचे रुग्ण मर्यादित होते. मात्र मोठ्या प्रमाणात झालेल्या लोक संपर्कातून शहरात कोरोना अधिक प्रमाणात पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!