बंधाऱ्यात ५० दिवस पुरेल एवढेच पाणी :
पंढरपूर : eagle eye news
येथील बंधाऱ्यात केवळ चाळीस ते ५०दिवस पुरेल एवढा पाणी साठा असल्याने आज ( दि. ३० ) पासून शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्यास सुरुवात होत आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
चंद्रभागा नदीवर दगडी पुला जवळ असलेल्या नवीन बंधाऱ्यामधून पंढरपूर शहराला पाणी पुरवठा केला जातो. परंतु या बंधाऱ्यात पाणीसाठा कमी आहे. उजनी धरणातील पाणीसाठा कमी असल्याने उजनीची पाणी पातळी लक्षात पंढरपूर शहरातील पाणी पुरवठया मध्ये कपात करणे आवश्यक आहे. पंढरपूरच्या बंधाऱ्यामध्ये केवळ ४० ते ५० दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे.
त्यामुळे पंढरपूर शहराला एक दिवसा आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपरिषदेने घेतला आहे. सोमवार ( दि. २९ रोजी ) रुळाच्या खालील भागास पाणी सोडले तर आज ( दि.३० ) रुळाच्या वरच्या भागाला पाणी पुरवठा होईल. उद्यापासून दररोज शहरात एक दिवसा आड पाणीपुरवठा होणार आहे, तरी पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांनी पाण्याची सद्यस्थिती पाहता काटकसरीने पाण्याचा वापर करावा असे आवाहन पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने करण्यात येत आहे.