पंढरपूर : eagle eye news
पंढरपूर क्रेडाईच्यावतीने येत्या १९ ते २१ जानेवारी दरम्यान पंढरीत रेल्वे मैदानावर भव्य ‘गृह उत्सव २०२४’ आयोजित करण्यात आला असून या गृह उत्सवाच्या शामियाना उभारणीचा भूमी पूजन समारंभ शनिवारी संपन्न झाला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी पंढरपूर क्रेडाईचे अध्यक्ष अमित शिरगांवकर, उपाध्यक्ष आशिष शहा, सचिव मिलिंद देशपांडे, सहसचिव शशिकांत सुतार, खजिनदार संतोष कचरे, विवेक परदेशी तसेच पंढरपूर क्रेडाईचे सर्व सदस्य तसेच क्रेडाई वुमन्स विंग व क्रेडाई युथ विंग चेही सदस्य उपस्थित होते.
या गृह महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार दि. १९ रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असून या गृह उत्सव प्रदर्शनामध्ये बांधकाम व्यवसायिकांचे गृह प्रकल्प, फ्लॅट्स, रो हाऊस , ओपन प्लॉट्स यांचे प्रदर्शन केले जाणार आहे. तसेच बांधकामास आवश्यक असणारे सळई, सिमेंट, रंग, सॅनिटरी वेअर आदी साहित्य प्रदर्शन व गृहकर्ज पुरवठा करणाऱ्या वित्त संस्था या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.
प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांसाठी पंढरपूर क्रेडाईतर्फे आकर्षक बक्षिसे व गृह प्रकल्पमध्ये नोंदणी करणाऱ्या ग्राहकांसाठी आकर्षक सूट ही ठेवण्यात येणार आहे, क्रेडाईचे अध्यक्ष अमित शिरगावकर यांनी दिली.