कौठाळीत सापडले नव्याने 6 पॉझिटिव्ह
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर येथील डॉक्टर सचिन रामलाल दोशी ( खटावकर) यांचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर कौठाळी येथे शुक्रवारी नव्याने 6 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे गावातील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 22 तर तालुक्यातील एकूण बळींची संख्या आता 28 झाली आहे.
पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रकोप कायम असून गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील यांचे कोरोनामुळे निधन झाल्यानंतर शुक्रवारी पहाटे एका डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची बातमी आली. वैद्यकीय क्षेत्रात यापूर्वीच कोरोनाची लागण झाली होती, तथापि एका डॉक्टरावर मृत्यू ओढवण्याची ही पहिलीच दुर्दैवी घटना घडली आहे.
डॉ. सचिन रामलाल दोशी (खटावकर ) यांना पंधरा दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता, ते तातडीने पुण्याला उपचारासाठी दाखल झाले होते . मात्र उपचारादरम्यान अखेर आज ( शुक्रवारी ) पहाटे पुण्यात नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मावळली. दोशी हे केवळ चाळीस वर्षे वयाचे होते. तालुक्यातील कासेगावमध्ये ते वैद्यकीय सेवा देत असत. ग्रामीण भागातील एक निष्णात डॉक्टर म्हणून त्यांचा परिचय होता. त्यांच्या मागे पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे .
दरम्यान, तालुक्यातील कौठाळी येथे शुक्रवारी आणखी 6 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या गावातील एकाच कुटुंबातील 12 लोक पॉझिटिव्ह असल्याने गावात चिंता व्यक्त होत आहे. कोरोनाला पायबंद बसावा म्हणून आरोग्य विभागाने उपाययोजना अमलात आणली आहे. 12 पॉझिटिव्ह सापडलेल्या कुटुंबाच्या संपर्कातील सर्व लोकांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेतली जात आहे. आज तेथील 50 लोकांची टेस्ट घेतली असता 6 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
त्यामुळे आता गावातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 22 झाली आहे.