पंढरीत गणेशमुर्ती विसर्जनासाठी दारी आली चंद्रभागा

मूर्ती दान केल्यानंतर मनसेचा आणखी एक अभिनव उपक्रम

पंढरपूर : ईगल आय मीडिया

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी मनसेच्या वतीने गणेशभक्तांच्या दारी चंद्रभागा ही संकल्पना राबवण्यात येत आहे. शहरातील गणेश भक्तांना आता चंद्रभागा नदीवर न जाता चंद्रभागेचे पाणी घेवून आलेल्या रथामध्ये गणेशमूर्तींचे विसर्जन करता येणार आहे.
यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी उद्या पासून शहरातील विविध भागात तीस रथाद्वारे बाप्पांच्या विसर्जनाची सोय केली आहे.
मनसेच्या या आगाळ्यावेगळ्या गणेश विसर्जन उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

मनसेने शहरातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी विसर्जन रथ तयार केले आहेत. या रथामध्ये पाण्याची टाकी ठेवण्यात आली असून या टाकीमधील चंद्रभागेच्या पाण्यात बाप्पाचे विसर्जन करुन निरोप देता येणार आहे.

उद्यापासून शहरातील विविध भागात सकाळी  8 ते संध्याकाळी 8 वाजे पर्यंत गणेश भक्तांच्या घरी हे रथ जाणार आहेत. त्या ठिकाणी गणेशभक्तांना आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन करता येणार आहे.

गणेश चतुर्थीला मनसेने शहरातील सुमारे 9 हजाराहून अधिक गणेशभक्तांना मोफत गणेशमूर्ती भेट दिल्या होत्या.

मनसेच्या या गणेश विसर्जन उपक्रमामुळे चंद्रभागेचे प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे. यंदाचा गणेश उत्सव शांततेत आणि पर्यावरण पूरक साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केेले होते.

गणेशभक्तांनी गणेश विसर्जन रथामध्येच गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहन ही मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केले आहे.यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, सागर घोडके, महेश पवार, प्रताप भोसले, अवधूत गडकरी, कृष्णा मासाळ इत्यादी उपस्थित होते,,

Leave a Reply

error: Content is protected !!