पंढरपूर नगरपालिका निवडणुकिसाठी मनसेची जय्यत तयारी

नगरपालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांनी तयारीला लागावे : दिलीप धोत्रे

पंढरपूर : ईगल आय मीडिया

आपल्या आणि आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास साधणे, नवनिर्माणाची कास धरून जनतेला एक चांगला पर्याय देण्यासाठी मनसेचे जास्तीत जास्त उमेदवार नगरपालिका निवडणुकांत विजयी झाले पाहिजेत. सध्या अनेक पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या संपर्कात आहेत, याबाबत योग्य निर्णय घेऊ तत्पूर्वी सर्वांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पंढरपूर कार्यालयात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आगामी नगरपालिका, पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात प्रमुख पदाधिकारी व मनसैनिकांची बैठक झाली. यावेळी धोत्रे यांनी सर्वांना मार्गदर्शन केले.

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षात लोकांच्या सुखदुःखाची साथ दिली जात आहे. कोरोनाच्या काळात लोकांना मदतीचा हात मनसेने दिला. तर गतपंचवार्षिक निवडणुकांमध्ये मनसेचे काही उमेदवार रिंगणात होते. आता गेल्या पाच वर्षातील चांगल्या तयारीनिशी मोठ्या ताकतीने मनसे आगामी निवडणुकीत नगरपालिकेच्या आखाड्यात दिसेल. परिवर्तनाचा आणि विकासाचा धागा घेऊन लोकांच्या मनात घर करण्यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या नेतृत्वात सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी सज्ज असतील, असा विश्वास यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केला.

पंढरपूर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच एकमेव पर्याय असू शकतो. ही बाब जनतेला पटवून देण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आतापासूनच कामाला लागावे. राज साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात नवनिर्माणाची कास धरून तीर्थक्षेत्र पंढरपूर हे येथील नागरिकांसह भाविकांच्या हितार्थ काम करणारा व विकास साधणारे पंढरपूर व्हावे. यासाठी आपण प्रयत्नशील असणे गरजेचे आहे.

मनसेच्या वतीने गेल्या दीड वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या सुखदुःखाचे वाटेकरी होण्याचे काम सर्वांनीच केले आहे. त्यामुळे आज शहरातील इतरही पक्ष संघटना आणि त्यांचे पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संपर्कात आहेत. त्याबाबतचा योग्य निर्णय माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर आपण घेऊच. परंतु आत्ता शहराच्या सर्वाग सुंदर विकासासाठी आपण सर्वांनी सज्ज झाले पाहिजे. असेही यावेळी धोत्रे म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!