राज्यात १०८ तर देशात ५४३ वा क्रमांक : प्रशासनाच्या काळात पंढरपूर शहरात स्वच्छतेचा बोजवारा

पंढरपूर : eagle eye news
केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ पुरस्कार स्पर्धेत पंढरपूर नगरपालिकेची मोठी अधोगती झाली असून प्रशासनाचा नाकर्तेपणाची लक्तरे निघाली आहेत. तीर्थक्षेत पंढरीचा देशात चक्क ५४३ वा नंबर आलेला आहे. सासवड सारखी छोटी नगरपालिका राज्यात पहिल्या क्रमांकाची मानकरी ठरलेली असताना विठूरायाची पंढरी मात्र चक्क राज्यात १०८ व्या क्रमांकावर घसरली आहे. एकूणच मागील एक वर्षात प्रशासकीय नाकर्तेपणाची शिक्षा पंढरपूरकरांना मिळाली आहे.
केंद्र शासनाचे स्वच्छता सर्व्हेक्षण पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. यामध्ये राज्यात सासवड नगरपालिका प्रथम आलेली आह. तर पंढरपूर नगरपालिकाचक्क १०८ व्या क्रमांकावर घसरली आहे. लाजिरवाणी बाब म्हणजे देश पातळीवर पंढरपूर नगरपालिकेचा ५४३ नंबर आलेला आहे. देश, राज्य पातळीवर स्वच्छतेच्या बाबतीत घसरण झालेली आहे. पुणे विभागातही पंढरपूर नगरपालिका ४७ व्या क्रमांकावर घसरली आहे.
विशेष म्हणजे स्वच्छ सर्व्हेक्षण २०२२ साली पंढरपूर नगरपालिका राज्यात १६व्या क्रमांकावर होती, यंदा १०८ व्या क्रमांकावर गेली आहे. पुणे विभागीय पातळीवर मागील वर्षी पंढरपूर शहर २५ व्या क्रमांकावर होते यंदा ४७ व्या क्रमांकावर घसरण झालेली आहे. यावरून प्रशाकीय काळात पंढरपूर नगरपालिकेचे स्वच्छतेकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. पालिकेच्या या निष्काळजीपणाचा फटका मागील वर्षी पंढरपूरकरांना बसला आहे. हजारो नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या आजाराचा सामना करावा लागलेला आहे.
मागील दोन वर्षांपासून पंढरपूर नगरपालिकेत प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या नेतृत्वाखालील प्रशासकाचे राज्य असून नागरिकांना स्वच्छता, पिण्याचे स्वच्छ पाणी, खड्डेमुक्त रस्ते, धूळमुक्त हवा, अंधारमुक्त रस्ते, उपनगरे, स्वच्छ आणि उपयुक्त उद्याने देण्यात अपयश आलेले आहे. पंढरपूर नागरिकांना याचा फटका बसला तसाच लाखो भाविकांनाही पालिकेच्या या गैर कारभाराचा त्रास सहन करावा लागला आहे.