पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण

सफाई कामगारांना १० लाखाचा पोस्टल अपघात विमा योजनेचा लाभ देणार : डॉ.प्रशांत जाधव

पंढरपूर : eagle eye news

पंढरपूर नगरपरिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे क्षमता व बांधणी प्रशिक्षण शिबिर नगरपालिका सभागृह येथे संपन्न झाले. या शिबिराचे उद्घाटन मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांचे हस्ते करण्यात आले होते. यावेळी उपमुख्याधिकारी ऍड. सुनील वाळूजकर,आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, डॉ .नीतू सिंग प्रमुख उपस्थित होते. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना १० लाख रुपयांच्या टपाल अपघात विम्याचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी दिली.

यावेळी बोलताना मुख्याधिकारी डॉ प्रशांत जाधव यांनी सांगितले की , जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार नगर परिषदेचे प्रशासक गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे क्षमता व बांधणी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेले आहे. पंढरपूर शहरामध्ये वर्षातून चार मोठया यात्रा व इतर वेळी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात येणाऱ्या भाविकांना सेवा सुविधा देत असताना आरोग्याचे यंत्रणेवर ताण येत असतो. शहर स्वच्छतेचे काम नगर परिषदेचे सर्व सफाई कर्मचारी अतिशय प्रामाणिकपणे करत असतात परंतु स्वच्छतेचे काम करत असताना काळजी घेणे ही आवश्यक आहे. सफाई कर्मचाऱ्यांचे जीवनमान दर्जा उंचावण्याचे दृष्टीने नगरपरिषदेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांचा रक्कम रुपये ३९६ पोस्टल विभागाकडे भरून दहा लाखाचा विमा उतरवण्यात येणार असल्याची माहिती डॉ.प्रशांत जाधव यांनी दिली. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधने देण्यात आली व त्याचा वापर करणे विषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी उपमुख्याधिकारी अँड.सुनिल वाळूजकर,आरोग्य अधिकारी श्री शरद वाघमारे श्री नागनाथ तोडकर व सर्व सफाई कर्मचारी सर्व मुकादम उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!