‘कॉरिडॉर झालाच पाहिजे’, अशा घोषणा दिल्यानंतर मंदिर परिसरातील दुकाने बंद झाली

एकादशी असूनही पंढरपूर बंद ला उत्स्फूर्त प्रतिसाद !

पंढरपूर ; eale eye news

महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमान प्रकरणी सोमवारी पंढरपूरमध्ये पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्री विठ्ठल मंदिर परिसरात या बंदला सकाळी प्रतिसाद मिळाला नव्हता, मात्र बंदचे आवाहन केलेल्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी ‘कॉरिडॉर झालाच पाहिजे’, अशा  घोषणा दिल्यानंतर मात्र मंदिर परिसरातील दुकानेही बंद झाली. सोमवार आणि एकादशी असतानाही पंढरपूरच्या व्यापाऱ्यांनी हि या बंदमध्ये सहभाग घेतला. त्यामुळे पंढरपूर बंद यशस्वी झाल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमान प्रकरणामुळे शहरातील बहुतांश भागातील दुकाने सकाळपासून बंद होती. मात्र श्री विठ्ठल मंदिर परिसरातील दुकाने सकाळी सुरूच होती, बंदचे आवाहन करणाऱ्या संघटनांचा मोर्चा चौफाळ्यात आला असता मंदिर परिसरातील दुकाने सुरु असल्याचे दिसले. त्यामुळे  मोर्चातील काही पदाधिकाऱ्यांनी ‘ पंढरपूर  कॉरिडॉर झालाच पाहिजे ‘ अशा घोषणा दिल्या. त्यानंतर लगेचच मंदिर परिसरातील दुकानेही बंद करण्यात आली. तसेच मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा असल्याच्या पोष्ट सोशल मीडियावर केल्या.

राज्यपाल भगतसिंग कोषारी यांच्यासह राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या काही नेत्यांनी मागील काही दिवसांत छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी या बंदचे आवाहन सर्व पक्षीय आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने करण्यात आले होते.या आंदोलनात भाजप वगळता सर्व राजकीय पक्ष, सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, हजारो कार्यकर्ते सामील झाले होते. 


सकाळी महात्मा फुले यांच्या स्मारकापासून आंदोलकांनी मोर्चा काढला. चौफाळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर, राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मारक स्थळी पुतळ्यास पुष्पहार घालून हा मोर्चा स्टेशन रोड वरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर  स्मारक या ठिकाणी आला .

Leave a Reply

error: Content is protected !!