पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ : एकाच गावात सापडले 30 पॉझिटिव्ह रुग्ण

आरोग्य विभागावर कोरोनाचा अटॅक : एका कर्मचाऱ्याचा मृत्यू तर 7 जण पॉझिटिव्ह

पंढरपूर : ईगल आय मीडिया

मागील 3 ते 4 दिवसांत काहीसा कंट्रोलमध्ये असलेला कोरोना मंगळवारी उसळून वर आला असून त्याने तालुक्यातील आरोग्य विभागावरच जोरदार हल्ला केला आहे. गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील शिपाई कर्मचारयासह 5 इतर आणि तुंगत, कासेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 2 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसऱ्या बाजूला तालुक्यातील उत्तर भागातील एका मोठ्या गावात तब्बल 30 रुग्णांना पॉझिटिव्ह कोरोना असल्याचे टेस्ट नंतर समोर आले आहे. यामुळे तालुक्यातील प्रशासनात खळबळ उडाली आहे. तसेच आरोग्य विभागातून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंढरपूर तालुक्यात शनिवारपासून कोरोना काहीसा कंट्रोलमध्ये आल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. या तीन दिवसात तुलनेने कमी संख्येने रुग्ण आढळले होते.
मात्र मंगळवारी एकदम कोरोनाचा प्रतिहल्ला झाल्याचे समोर आले. शहरातील एका डॉक्टर दाम्पत्यास कोरोनाची लागण झाली असतानाच तालुक्यातील आरोग्य विभागावरच त्याने अटॅक केला असून गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 54 वर्षीय शिपाई कर्मचारी कोरोनाचा बळी ठरला आहे. सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील हा पहिलाच बळी असून आरोग्य विभाग यामुळे हादरला आहे.

गादेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील अन्य 5 कर्मचाऱ्यांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच तुंगत, कासेगाव आरोग्य केंद्रातील प्रत्येकी 1 आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील आरोग्य विभागातील 7 कर्मचारी एकाच वेळी पॉझिटिव्ह सापडले आहेत. या कर्मचाऱ्यांच्यावर वाखरी mit कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू केले आहेत.

दरम्यान, भोसे या एकाच गावात मंगळवारी 8 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, तर रॅपिड टेस्टमध्ये 22 पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल आले आहेत. भोसे लगत असलेल्या खेडभोसे गावात 6 तर सुगाव भोसे ( पुन. ) या गावात 1 रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने भोसे परिसरात खळबळ उडाली आहे. भोसे गावात आजवर कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता मात्र मंगळवारी एकदम 30 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत.
मंगळवारी पंढरपूर शहरात मोठ्या संख्येने कोरोना तपासणी झाली असून शहरात सुद्धा कोरोनाची संख्या काळजी करण्याइतपत वाढली असल्याचे समजते.
मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन 7 ते 13 ऑगस्ट दरम्यान लॉक डाऊन जाहीर केला असतानाच शहर व तालुक्यात कोरोनाने पलटवार केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नागरिकांत तसेच प्रशासनात ही खळबळ उडाली आहे.
दरम्यान सोमवारी घेण्यात आलेल्या टेस्टनुसार मंगळवारी 34 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे समोर आले आहे. यामध्ये भोसे 8, कासेगाव 7, शिरगाव 3 पंढरपूर शहर 15 रुग्ण सापडले आहेत. शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 620 वर गेली आहे.

One thought on “पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा धुमाकूळ : एकाच गावात सापडले 30 पॉझिटिव्ह रुग्ण

Leave a Reply

error: Content is protected !!