24 दिवसांनी पंढरपुरात पाऊस परतला

शहरात 70 मिमी, भंडीशेगाव मंडल 65 मिमी ची नोंद

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गेल्या तब्बल 24 दिवस विश्रांती घेतलेला पाऊस अखेर परतला असून पंढरपूर शहरात सर्वाधिक 70 मिमी एवढा पाऊस सोमवारी मध्यरात्री बरसला आहे. तर भंडीशेगाव मंडळ 65 मिमी, पटवर्धन कुरोली 54 तर कासेगाव मंडल 49 मिमी एवढा दमदार पाऊस झाला आहे.

पंढरपूर तालुक्यात यंदा पावसाने जूनच्या सुरुवातीपासून समाधानकारक हजेरी लावली. त्यामुळे 20 वर्षात प्रथमच उजनी धरणातून पाणी न सोडताही भीमा नदी गेल्या 3 महिन्यात कायम वाहती राहिली आहे. मात्र गेल्या 24 दिवसांत तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली होती. या दरम्यान गौरी गणपतीचा सणही पार पडला तरीही पाऊस परतला नव्हता. मात्र रविवारी रात्री उशिरा विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडटासह पावसाचे आगमन झाले. शहरासह तालुक्यातील 8 पैकी 7 मंडळात पावसाने हजेरी लावली आहे. केवळ पुळूज मंडळात पाऊस झाला नाही. तर
तुंगत मंडळात सर्वात कमी 2 मिमी पाऊस नोंदवला गेला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस पावसाचा मुक्काम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

पंढरपुर तालुक्यातील सर्व 8 मंडळात 7 सप्टेंबर रोजी झालेले पर्जन्यमान मंडळनिहाय पुढीलप्रमाणे आहे.


करकंब 9मिमी, पट कुरोली 54मिमी, भंडीशेगाव 65मिमी, भाळवणी 27मिमी, कासेगाव 49मिमी, पंढरपूर 70मिमी, तुंगत 2मिमी, चळे 9मिमी, पुळुज 0मिमी


सोमवारी मध्यरात्री तालुक्यातील सर्व मंडळात मिळून सरासरी पाऊस 31.66मि. मी.
असून आज अखेर सरासरी पाऊस 436.74मिलिमीटर एवढा पाऊस झाला आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. त्यामुळे आता परतीच्या पावसामुळे भीमा नदीला पूरस्थिती येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!