पंढरपूर तालुक्यात 100 पैकी 83 गावात पोहोचला ‘ तो ‘

मृत्यू झालेल्याची वाटचाल शतकाकडे

पंढरपूर : ईगल आय मीडिया

जगभरात घोडदौड करणाऱ्या कोरोनाचा 22 मे पर्यंत पंढरपूर तालुक्यात शिरकाव ही झालेला नव्हता मात्र 100 दिवसात त्याने तालुक्यातील 100 पैकी 83 गावात घुसखोरी केली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही 100 होण्याकडे धावू लागली आहे.

कोरोना या जागतिक महामारीने सोलापूर जिल्ह्यात एप्रिल अखेरीस पाऊल ठेवले. पंढरपूर तालुका प्रशासनाने मोठ्या निकराने कोरोनाला 22 मे पर्यंत तालुक्याबाहेर थोपवून ठेवले होते. 22 मे रोजी मुंबईहून आलेला उपरी येथील एकजण पॉझिटिव्ह निघाला आणि कोरोनाचा शिरकाव तालुक्यात नोंदवला गेला. वास्तविक त्यानंतर काही दिवस तालुका कोरोनामुक्त होता.

मात्र जूनच्या दुसऱ्या पंधरवाड्यानंतर पंढरपूर शहर, करकम्ब परिसरात रुग्ण सापडले आणि कोरोनाची वाटचाल वेगाने सुरू झाली. बघता बघता तालुक्याच्या 100 पैकी 83 गावात कोरोना पोहोचला आहे. आणि ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्याही 1700 पेक्षा जास्त झाली आहे. 81 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये पंढरपूर तालुक्याचे भाग्यविधाते मानले गेलेल्या माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, माजी जिल्हा परिषद सदस्य राजूबापू पाटील यांच्या सारख्या बड्या आसामीचाही समावेश आहे. या दोन्ही नेत्यांसह त्याच्या कुटुंबातील कोरोनाच्या उपद्रवामुळे संपूर्ण तालुका हादरून गेला आहे.


पंढरपूर तालुक्यात 100 महसुली गावे आहेत, त्यापैकी तब्बल 83 गावात कोरोनाचे 1742 रुग्ण आढळून आलेले आहेत. आणि त्यापैकी 38 जणांचा मृत्यू झालेला आहे. गेल्या काही दशकामध्ये तालुक्यात पहिल्यांदा च एखाद्या साथीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला आहे आणि मोठ्या संख्येने जीवितहानी झालेली आहे.


कोरोनाच्या वाढत्या आजाराला आवर घालत असताना तालुक्यातील आरोग्य, पोलीस, महसूल, नगरपालिकेच्या प्रशासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांनाही या अग्निदिव्यातून जावे लागले आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, अनेक पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी कोरोना बाधित झालेले आहेत. त्यामुळे एकूणच तालुक्यातील जनजीवन गेल्या 5 महिन्यात पूर्णपणे विस्कळीत आणि भयभीत झालेले आहे. कोरोनाचे संकट संपूर्ण तालुक्यात थैमान घालत असून आणखी किती प्रसार होतो याची भीती व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!