माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही
उपस्थित वारकरी महिलांनी हात उंचावून मंदिर समिती संरक्षण कायद्यास पाठिंबा दिला
प्रतिनिधी : संगमनेर
पंढरपूरचा पांडुरंग हा गोरगरीब कष्टक-यांचे दैवत आहे. या दैवताला वारकरी थेट भेटू शकतात. या विठूरायाला वारक-यांपासून तोडले जात असेल तर कदापि सहन केले जाणार नाही. आता आहे त्या स्थितीत पाडुरंग वारक-यांचाच रहावा यासाठी सुरू असलेल्या लढ्यात आंम्ही वारक-यांच्या गाठीशी राहून गंभीरपणे साथ देऊ , अशी स्पष्ट ग्वाही माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
घुलेवाडी ( ता. संगमनेर ) येथे आयोजिलेल्या कीर्तनमहोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. घुलेवाडी येथे सालाबाद प्रमाणे कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या सांगतेनिमित्त ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर यांचे सांगतेचे काल्याचे कीर्तन होते. यावेळी बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे उपस्थिती होते.
यावेळी कीर्तनात शामसुंदर महराज सोन्नर यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर पुन्हा पहिल्या पुजाऱ्यांच्या ताब्यात द्यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाली असल्याचे सांगून याविरुद्ध वारकरी आक्रमक झाले असल्याची माहिती दिली. पांडुरंगाला बडव्याच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी अनेक वर्षे लढा द्यावा लागला. एवढ्या संघर्षानंतर पांडूरंग वारक-यांचा झाला, तो पुन्हा त्यांच्या ताब्यात गेला तर आणखी किती संघर्ष करावा लागेल ते सागता येणार नाही, त्यामुळे वारक-यांच्या लढ्याला आपण पाठिंबा द्यावा, अशी मागणी शामसुंदर महराज यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली.
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, पंढरीचा पांडुरंग गोरगरीब-कष्टक-यांचा देव आहे. एकमेव देव असा आहे की, ज्याला थेट भेटता येते, हा पांडुरंग कायम वारक-यांचाच राहण्यासाठी जो कायदेशीर आणि रस्त्यावरील लढा उभा राहील त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा, अशी ठाम ग्वाही थोरात यांनी दिली.
यावेळी उपस्थिती सर्व वारक-यांनी पुंडलिक वरदेचा गजर करुन वारक-यांच्या लढ्याला पाठिंबा दिला. हा कीर्तन महोत्सव यशस्वी करण्यासाठी कानिफनाथ डपकरी मंडळ, सिताराम राऊत, हरी ढमाले, उपसरपंच दत्तात्रय राऊत, समस्त घुलेवाडी ग्रामस्त यांनी प्रयत्न केले.