जनतेच्या मनातील उमेदवार : अजित पवार

भगीरथ भालके यांच्या उमेदवारी चे संकेत !

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकित सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेच्या मनात असणारा उमेदवार दिला जाईल, मात्र सगळे मतभेद विसरून कामाला लागा आणि उमेदवार निवडून आणा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान आज कार्यकर्त्यांची मते जाणून घेत असताना 90 टक्के हुन अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी भगीरथ भालके यांनाच उमेदवारी द्या अशी मागणी केल्याचे दिसून आले. त्यानंतर अजित पवारांनी जनतेच्या मनातील उमेदवार दिला जाईल अशी ग्वाही दिली.

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस च्या अंतर्गत गटबाजी आणि उमेदवार निवडी साठी कार्यकर्त्यांची बैठक येथील श्री यश पॅलेस येथे बोलावण्यात आली होती. यावेळी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ.संजय शिंदे, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, पक्ष निरीक्षक सुरेश घुले, संजय पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे पाटील आदींसह पक्षाचे पदाधिकारी, पंढरपूर, मंगळवेढा तालुक्यातील सर्व विभागाचे पदाधिकारी, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

अजित पवार यांनी यावेळी बोलताना उमेदवार जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा असला तरी तो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल, त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा सर्व सहकारी पक्षांना विश्वासात घेऊन निवडणूक लढवावी आणि मोठ्या मतांनी ही जागा जिंकावी असे आवाहन केले. आज सर्वांची मते जाणून घेतली आहेत, पक्षाच्या वरिष्ठांना जनतेच्या मनात असलेल्या उमेदवाराचे नाव कळवले जाईल, पवार साहेब उमेदवार जाहीर करतील असे पवार म्हणाले.

यावेळी पवार यांनी दोन्ही तालुक्यातील शहर आणि ग्रामीण भागातील पदाधिकारी यांना बंद खोलीत बोलावून त्यांना उमेदवार कोण असावा अशी विचारणा केली. यावेळी 90 टक्केहून अधिक लोकांनी भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. त्यानंतर सर्व कार्यकत्यांना एकत्र बसवून ना.जयंत पाटील आणि अजितदादा पवार यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मागे जे झाले ते विसरून एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन केले.

यावरून भगीरथ भालके यांनाच राष्ट्रवादी ची उमेदवारी मिळेल असे संकेत मिळाले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!