पंढरपूर – मंगळवेढा विधानसभेवर शिंदे सेनेचाही दावा

भैरवनाथ शुगरचे अनिल सावंत निवडणूक लढवण्यासाठी सज्ज

पंढरपूर : ईगल आय न्यूज

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य शिवसेनेने दावा सांगत भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांनी निवडणूक लढवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. शिवसेनेकडून ही सावंत यांच्या उमेदवारीची मागणी होऊ लागली आहे. शिवसेनेच्या युवा आघाडीचे जिल्हा प्रमुख बालाजी बागल आणि पंढरपूर शहर प्रमुख विश्वजित भोसले यांनी ही जागा शिवसेनेला सोडावी अशी मागणी केली आहे.

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा निवडणुकीचे बिगुल अद्याप वाजलेले नाही, तोवरच राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. आ.समधना अवताडे यांनी पुन्हा भाजपकडून उमेदवारी निश्चित समजून कंबर कसली आहे तर भाजप नेते माजी आ.प्रशांत परिचारक यांनीही गावभेट दौरे सुरू केले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे.

या पार्श्वभूमीवर महायुतीचा घटकपक्ष असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने ही जागा युतीमध्ये परंपरेनुसार शिवसेनेची आहे, त्यामुळे सेनेला ही जागा सोडावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये या जागेसाठी ओढाताण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुढे बोलताना बालाजी बागल म्हणाले की, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या नेतृत्वाखालील भैरवनाथ शुगर्स ने अकरा वर्षांपूर्वी मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथे माळरानावर भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड या साखर कारखान्याची उभारणी केली.

लवंगी सारख्या दुष्काळ ग्रस्त भागांमध्ये साखर कारखान्याची उभारणी करून त्या भागामध्ये असणारा उसाचा प्रश्न सोडवला. तसेच त्या भागातील हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हॉईस चेअरमन अनिल सावंत हे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक व राजकीय कार्यक्रमांमध्ये सातत्याने सहभागी असतात. आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य शिबिर, वाहतुकीच्या समस्या याबाबतीत वारंवार पाठपुरावा केला आहे.डॉ. तानाजी सावंत हे आरोग्य मंत्री झाल्यापासून दोन्ही तालुक्यातील हजारो रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी अनिल सावंत यांनी प्रयत्न केले आहेत.

अनिल सावंत हे पंढरपूरमध्येच कायमचे स्थायिक झाल्याने शहर व आसपासच्या परिसरामध्ये त्यांचाही सतत संपर्क असतो, त्यामुळे भाजपमध्ये उमेदवारीवरून वाद सुरू होत असताना अनिल सावंत यांना महायुतीकडून उमेदवारी मिळावी. ही जागा गेल्या पन्नास वर्षात शिवसेनेने कायम लढवली आहे आणि शिवसेनेने या मतदारसंघातील आपली राजकीय ताकद दाखवली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महायुतीकडून अनिल सावंत यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी बालाजी बागल आणि विश्वजित भोसले यांनी केली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!