मंगळवेढा : २४ गावांसाठी २ टीएमसी पाणी राखीव

ना. जयंत पाटील : भगीरथ भालकेंचा उमेदवारी अर्ज दाखल

पंढरपूर : ईगल आय मीडिया

३५ गावच्या पाण्यासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता द्या, अशी सर्वसामान्य जनतेची विविध कामे घेऊन ते तासन‌्तास खा. शरद पवार, अजित पवार व माझ्याकडे सतत येऊन बसायचे. भारत नानांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर ३५ गावातील ११ गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी दिले. राहिलेल्या २४ गावांच्या पाणीप्रश्नासाठी २ टीएमसी पाणी राखून ठेवले आहे. आचारसंहिता संपताच त्याचा नव्याने अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे जलसंपदामंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी, महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पंढरपुरात आले होते. त्यावेळी श्रीसंत तनपुरे महाराज मठात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. संजय शिंदे, कॉग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, दीपक साळुंखे, सुरेश घुले, उमेश पाटील, युवकचे प्रदेशाध्यक्ष महिबूब शेख, शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, बळीराम साठे, साईनाथ अभंगराव, रवी मुळे, दिलीप देवकुळे, चेतन नरोटे, युवराज पाटील, दीपक पवार, संदीप मांडवे, विजयसिंह देशमुख आदी उपस्थित होते.

फडणवीस शब्द पाळतील !

जयंत पाटील यांनी मिश्किल टिपणी करत देवेंद्र फडणवीस हे शब्द पाळणारे नेतृत्व आहे. भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी अर्ज माघारी घेण्यासाठी ३ तारखेपर्यंतचा वेळ आहे. त्यामुळे ते आपल्या उमेदवाराला अर्ज माघारी घेण्यास भाग पाडतील व भगीरथ भालकेंना बिनविरोध करण्यासाठी हातभार लावतील, अशी टिका करताच कार्यकर्त्यांनी जोरदार दाद दिली.

राज्यामध्ये राष्ट्रवादी, कँग्रेस, शिवसेना व मित्र पक्षांची महाविकास आघाडी एकत्र आल्यानंतर भाजपचा राज्यभरात कोणत्याही निवडणुकीत एकही उमेदवार विजयी झाला नाही, ही वस्तूस्थिती आहे. या पोटनिवडणुकीतही पराभव अटळ आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी एकसंध आहे. आघाडीतील सर्व पक्षांशी चर्चा करूनच भगीरथ भालके यांना उमेदवारी दिली आहे. स्व. भालके यांचे विचार व अपूर्ण कामे पुढे न्यावीत, यासाठी खा. शरद पवार यांनी भगीरथ भालकेंना उमेदवारी दिली आहे.

भगीरथ भालके सक्षम उमेदवार
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपण नानांच्या निधनानंतर अनेकवेळा या मतदारसंघात कानोसा घेतला होता. भगीरथ भालके यांनाच उमेदवारी द्यावी, अशी सर्वांची मागणी होती. भारत भालके हे जनतेची कळकळ असलेला नेता होता. त्यांचे सर्व गुण भगीरथ भालके यांच्यात आहेत. त्यामुळे त्यांची अपूर्ण कामे, जनतेची सर्व स्वप्ने पूर्ण करण्यासाठी भगीरथ भालके हे सक्षम उमेदवार आहेत. जनतेने त्यांच्यामागे सक्षमपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

संजय शिंदे यांनी भाषण करताना मी मागे एक पुढे एक बोलत नाही. भारतनाना आणि माझी घट्ट मैत्री होती. असे सागंत २००९ च्या निवडणुकीत मोहिते-पाटील इथं लढले नसते तर माढ्यात आले असते आणि त्यावेळी मी स्व. नानांना शब्द दिला होता. तुमच्या हातून सुटले तर आम्ही नक्कीच पाडू, लोकसभेत मला हरविण्यासाठी कोणी कोणी काम केले हे मला माहित आहे. तेच लोक आज आवताडेंना निवडून आणण्यासाठी पुढे पुढे करीत आहेत. मात्र मी आता लोकसभा पराभवाचा बदला घेण्याची संधी आली आहे, ती मी सोडणार नसल्याचे संजय शिंदे म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!