भारतनाना असते तर आमची घरं वाचली असती !

पंढरपूर नगरपालिकेच्या कारवाईनंतर नागरिकांना आठवले भारत नाना

पंढरपूर : ईगल आय मीडिया

‘आमचं नाना जाऊन अजून महिना झालं नाही, तोवर आमची घरं काढली, आज नाना असतं तर आमची घरं वाचली असती ‘ अशा शब्दात पंढरपूर शहरातील विस्थापित नगरातील महिलांनी आज आपल्या व्यथा मांडताना स्व. आ.भारत नाना भालके यांची आठवण काढली.

पंढरपूर नगरपालिकेने आज विस्थापित नगरात जे सी बी नेऊन अतिक्रमण असल्याचे सांगून लोकांची घरे काढली. त्यांचे संसार अक्षरशः उघड्यावर टाकले. यावेळी आम्हाला पर्यायी जागा द्या अशी विनवणी करणाऱ्या महिलांना पोलीसांच्या मदतीने बाजुला सारून नगरपालिकेने ही घरे काढून टाकली. यावेळी या लोकांचे संसार उघड्यावर पडलेले दिसून येत होते.

दरम्यान, शहरातील खोकी धारकांना ही आपल्या रोजी रोटीची चिंता भेडसावू लागली आहे. नगरपालिकेने आपली खोकी काढू नयेत यासाठी खोकी धारकांनी युवक नेते भगीरथ भालके यांच्याकडे धाव घेतली. भगीरथ भालके यांनीही यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांना फोन करून एकही खोके काढू नका अशी सूचना केली आहे.

पंढरपूर नगरपालिकेच्या या करवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत उघड्यावर आलेल्या महिलांना संकट समयी धावून येणाऱ्या स्व. आ.भारत नाना भालके यांची आठवण आली. अनेक महिलांनी यावेळी आपली व्यथा बोलून दाखवताना आज भारत नाना असते तर आमची घरे वाचली असती. भारत नाना जाऊन आणखी एक महिना झाले नाही तोवर आमची घरं काढून बेघर केल्याची खंत महिलांनी व्यक्त केली.

Leave a Reply

error: Content is protected !!