आढीव येथे प्रांताधिकारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत शुभारंभ
पंढरपूर : टीम ईगल आय
पंढरपूर तालुक्यातील 62 गावातील गावठाणाचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. ड्रोन सर्वेक्षणामुळे गावातील जमिनीवरून होणारे वाद विवाद कमी होण्यास मदत होणार आहे. पूर्वी मोजणीसाठी वेळ जात होता. मात्र सध्या आजच्या आधुनिक पद्धतीने ड्रोनद्वारे कमी कालावधीत सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाणार असून लवकरच जमीन मालकांना त्यांच्या हक्काची मिळकत पत्रिका मिळणार असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगीतले.
ग्राम विकास विभाग, जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय व भारतीय सर्वेक्षण विभाग डेहराडून यांच्या संयुक्त विद्यमाने आढीव (ता.पंढरपूर) येथे पंढरपूर तालुक्यातील गावठाण भूमापन ड्रोन सर्वेक्षण शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
तालुक्यातील 62 गावातील प्रत्येक घरांचा ड्रोनद्वारे सर्व्हे करण्यात येणार असून, मालकी बाबतचा पुरावा म्हणून मिळकत पत्रिका आणि सनद संबंधितांना पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे आवश्यक त्या बँकिंग तसेच इतर प्रशासकीय कामकाजात नागरिकांना मदत होणार असल्याचे भूमिअभिलेख उपाधिक्षक गणेश सोनार यांनी सांगितले .
यावेळी तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, सरपंच तेजस्वीनी नवले, ग्रामसेवक भासणे, तलाठी दिपक राउत, उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश सोनार यांनी केले तर आभार विकास कुमठेकर यांनी मानले.यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते