भगीरथ भालके यांची माहिती

मंगळवेढा : ईगल आय मीडिया
मंगळवेढा – पंढरपूर मतदारसंघात असलेल्या गावात अतिवृष्टी, वाहतूक वर्दळ आदी कारणामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी चालू वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये 23 कोटी 92 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांनी दिली.
महिन्याभरातील या सर्व कामांची टेंडर प्रक्रिया सुरू होऊन येणाऱ्या वर्षभरामध्ये हे सर्व रस्ते पूर्ण होणार आहेत, अशीही माहिती भगीरथ भालके यांनी दिली. सर्व रस्त्यांची दुरुस्ती व कामे करण्याच्या मागणीमध्ये मंजुरीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विशेष सहकार्य केल्याची माहिती भगीरथ भालके यांनी दिली.
खराब झालेल्या क्षतिग्रस्त असलेल्या रस्त्यांची सुधारणा व पूल बांधकामाची कामे आवश्यक असल्याने भगीरथ भालके यांनी फेब्रुवारी महिन्यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना मंगळवेढा व पंढरपूर येथील अनेक गावातील रस्त्यांच्या दुरुस्तीवर कामासाठी निधीची मागणी केली होती. या मागणी मंजुरीत पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लक्ष घालून सहकार्य केले आहे.
स्व. भालके यांच्या ‘त्या’ मागणी मुळे मिळाले 7 कोटी
अधिवेशन असो की मंत्रालयातील मंत्र्याकडे मतदारसंघातील कामं बाबतचा पाठपुरावा करीत असत. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे महापूर परिस्थिती उद्भवली. नदीकाठी असणाऱ्या तसेच वेगवेगळ्या भागातील पूल व रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. यामध्ये मंगळवेढा – पाटकळ, शिरसी, आंधळगाव, पाटकळ – भोसे – हुन्नुर भागातील सेतू पुलाची दुरुस्ती करण्यासाठी 1 कोटी 96 लाख रुपये तर हुन्नूर, मारोळी, बोराळे, लमान तांडा, कागष्ट या भागातील सेतू पुल, पाईप मोरी बांधणे, रस्ता दुरुस्ती यासाठी 36 लाख रुपये तर मंगळवेढा – खोमनाळ रस्त्यावरील लींगीरा ओढा, शिंपूजी ओढा, निंबोणी – बावची मधील सेतू दुरुस्ती करण्यासाठी 1 कोटी 83 लाख रुपये तसेच धर्मगाव – मल्लेवाडी – घरनिकी रस्त्यावरील सेतू पुलाची दुरुस्ती साठी 2 कोटी 10 लाख रुपये गोणेवाडी – लेंडवेचिंचाळे सेतू पुल दुरुस्ती 17 लाख रुपये अशी एकूण 6 कोटी 42 लाख रुपयांची कामे आता मार्गी लागणार आहेत.
यामध्ये पाटखळ – खडकी – नंदेश्वर रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी 4 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तर मानेवाडी – हुन्नुर – मारोळी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी दीड कोटी रुपये, राज्य मार्ग 561 शिवनगी – आसबेवाडी – सलगर (बु) रस्ता सुधारणा 4 कोटी रुपये, धरमगाव – मल्लेवाडी – घरनिकी रस्ता सुधारणा 4 कोटी महमदाबाद (हु) ते लोणार रस्ता सुधारणा साडेतीन कोटी, माचनुर, राहाटेवाडी ते बोराळे रस्त्यावरील राहाटेवाडी गावाजवळील मंगळवेढा ओढ्यावरील पुलाच्या बांधकामासाठी साडेतीन कोटी रुपये मंजूर आहेत.
पंढरपूर तालुक्यातील खर्डी – तावशी – एकलासपूर – नेपतगाव रस्ता सुधारणा करण्यासाठी दीड कोटी रुपये, तर खर्डी – तावशी – एकलासपूर – नेपतगाव रस्ता राज्यमार्ग 393 साठी दीड कोटी रुपये, याच मार्गावरच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी 2 कोटी रुपये असे एकूण 23 कोटी 92 लाख रुपये मंगळवेढा व पंढरपुर भागातील रस्त्यांच्या दुरुस्ती व विकासासाठी महाविकास आघाडी सरकारने मंजूर केले आहेत.