तरीही खचलेलो नाही ; पुढच्या काळात ताकदीने लढणार : पत्रकार परिषदेत काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी व्यक्त केला विश्वास
पंढरपूर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीतील पराभव स्वीकारतो, ही निवडणूक धनशक्तींविरुद्ध जनशक्ती अशी होती, जनशक्तीला हरवून धनशक्ती जिंकली.माझी लढत चुकीचे सरकार आणि चुकीचा उमेदवार यांच्याशी होती. माझी अडवणूक करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला. शेवटच्या सभेपर्यंत माझी अपेक्षा होती की महाविकास आघाडीतील मित्रपक्ष सहकार्य करेल पण ते झाले नाही.तरीही मला मात्र १ लाख १६ हजार मते मिळाली, काही लोक म्हणत होते की भालके संपले, त्यांच्या मागे लोक नाहीत अशा हवेत गोळ्या मारीत होते. प्रत्यक्षात पोट निवडणुकी पेक्षा ११ हजार मते अधिक मिळाली, मी आजपासून इथून पुढच्या काळात सर्व पंढरपूरकराच्या, सामान्य लोक,व्यापारी, व्यावसायिक, शेतकरी, ग्रामीण भागातील जनता यांच्या सोबत असेल, लोकांच्या अडचणीच्या काळात कधीही हाक द्यावी, अशी ग्वाही भगीरथ भालके यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत निसटत्या मतांनी पराभूत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी भगीरथ भालके यांनी पंढरपूर मध्ये पत्रकार परिषद घेतली आणि भूमिका मांडली. यावेळी माजी नगरसेवक सुधीर धोत्रे, किरण घाडगे, राहुल साबळे, नागेश यादव, ऍड. राजेश भादुले, शिवाजी मस्के, उमेश पवार, संजय बंदपट्टे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना भालके म्हणाले कि, पोटनिवडणुकीनंतर विठ्ठल ची जबाबदारी असल्याने मी काही काळ जनतेपासून दूर होतो, मात्र त्यानंतरही मी मतदार संघात लोकांच्या संपर्कात होतो. रिक्षा चालक, टांगा चालक असो की सामान्य खोके धारक, व्यापारी यांच्यासोबत पुढच्या काळात मी असेन. लढणे हे रक्तात आहे, मी लढत राहीन, जनतेचे पाठबळ माझ्या मागे आहे त्यामुळे मी समर्थ आहे. विधानसभा निवडणुकीत खासदार प्रणिती ताई सोडता कुणीही माझ्या पाठीशी नव्हते, मात्र सामान्य मतदार माझ्या पाठीशी होते, त्यामुळेच मला १ लाख १६ हजाराहून अधिक मतदान झाले.
ईव्हीएम मशीन मध्येच घोटाळा आहे असे सामान्य नागरिक बोलत आहेत, याबाबत पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते मंडळी ठरवतील. मात्र पराभव का झाला याची कारणे शोधून काढू, काही इतर कारणे असतील ती दूर करू आणि आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मी कार्यकर्त्यांच्या सोबत असेन त्यांच्यासाठी लढणार आहे अशीही ग्वाही दिली.
पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत ताकदीने उतरणार पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरणार आहे, पालिकेत अध्यक्ष नाही, नगरसेवक नाहीत, प्रशासनाच्या कारभारात सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होतोय, घर पट्टी , पाणी पट्टी वाढवल्या प्रकरणी आम्ही आवाज उठवला, गटारी तुंबलेल्या असतात, रस्ते वाईट आहेत, सर्वत्र धूळ असते यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत, शहराची दयनीय अवस्था आहे.आम्ही शहरातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेउन त्याच ताकदीने लढणार आहे, असेही भालके यावेळी म्हणाले.
परिचारक आणि आ. आवताडे यांच्याविषयी बोलताना भालके म्हणाले कि, ज्यानी मापे काढली, टीका केली त्यांचे पाय धरण्याची वेळ आली, विकास कामे केली होती तर साड्या वाटायची वेळ का आली ? असा सवाल करून साडे तीन वर्षे भोगले आहे, आजपासून पुढची पाच वर्षे भोगायला लागेल त्यासाठी त्यानी तयार राहावे, असा इशाराही दिला.