‘ वाझेंना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचा’ : खा. पवार

अनिल देशमुख यांच्याशी बोलून निर्णय घेऊ

टीम : ईगल आय मीडिया

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह दिल्लीत येऊन गेले. त्यानंतर लेटरबॉम्बचे सर्व प्रकरण घडले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार  यांनी केले. या सगळ्याचा परमबीर सिंह यांच्या दिल्लीवारीशी काही संबंध आहे का, हे मला माहिती नाही. माझ्याकडे तसे पुरावे नाहीत. केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणे हा परमबीर सिंह यांचा अधिकार आहे. त्याबाबत माझा काहीही आक्षेप नाही. मात्र, सर्व घडामोडी फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्या दिल्लीवारीनंतरच घडायला लागल्या, असेही खा.पवार यावेळी म्हणाले. परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे विरोधकांनी महाविकासआघाडी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी दिल्लीत झालेल्या पत्रकारपरिषदेत काही मुद्दे मांडले.

सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंह यांनीच घेतल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले. या सगळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोणतीही भूमिका नाही. गृहमंत्री केवळ आयुक्तपदासारख्या मोठ्या आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात निर्णय घेतात, असे शरद पवार यांनी सांगितले.

अनिल देशमुख यांचीही बाजू ऐकून घ्यावी लागेल. याबाबत सर्वांशी बोलून निर्णय घेऊ, गृहमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर परमबीर सिंग हे मला भेटले होते. त्यावेळी त्यांनी अन्याय होत आहे, असे त्यांनी सांगितले होते, असेही पवार म्हणाले. यावेळी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील, असे स्पष्ट केले.

मी आताच आग्र्याहून आलो आहे. मी याप्रकरणी आतापर्यंत केवळ मुख्यमंत्र्यांशीच बोललो आहे. पक्षातील सहकाऱ्यांशी अजूनही चर्चा केली नाही. राजीनामा घेण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी आमच्याशी चर्चा केली नाही. आम्ही देशमुखांचं म्हणणं ऐकून घेऊ आणि सहकाऱ्यांशीही चर्चा करू, असं पवार यांनी सांगितलं. मात्र, राजीनामा मागणं हे विरोधकांचं कामच आहे, असंही ते म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!