माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागितली
पंढरपूर ईगल आय न्यूज
माजी आ. प्रशांत परिचारक यांचे समर्थक माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, माजी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आणि उमेदवारीची मागणी केली. या घटनेमुळे पंढरपूरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. परिचारक यांच्यासाठी नागेश भोसले यांचे बंड अडचणीचे ठरणार आहे असे मानले जाते.
माजी आ. प्रशांत परिचारक यांचे खंदे समर्थक, मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांची भेट घेतली.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. साधना भोसले, माजी शहराध्यक्ष सुधीर भोसले, सुनील मोहिते आदींसह भोसले समर्थक उपस्थित होते. परिचारक हे सध्या भाजप मध्ये आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष किंवा राष्ट्रवादी कडून निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर भोसले यांनी जयंत पाटील यांची भेट घेतल्याने परिचारक गटात अस्वस्थता पसरली आहे.