पटवर्धन कुरोली खून : एका आरोपीस अटक,

१६ तारखेपर्यंत पोलीस कोठडी : बोलेरो जीप या गावात सापडली

पंढरपूर : ईगल आय न्यूज

पटवर्धन कुरोली (ता. पंढरपूर) येथे मागील भांडणाचा राग मनात धरून भररस्त्यावर बोलेरोखाली चिरडून मारल्याप्रकरणी मुख्य आरोपी ब्रह्मदेव संपत्ती नाईकनवरे याला करकंब पोलिसांनी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. या गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडीही ताब्यात घेण्यात आली आहे. आरोपी ब्रह्मदेव नाईकनवरे याला न्यायालयात हजर केले असता १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


पटवर्धन कुरोली येथे मागील भांडणाचा राग मनात धरून व सुनेच्या घटस्फोटामध्ये अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून देविदास दिगंबर नाईकनवरे (वय ४२, रा. पटवर्धन कुरोली) यांचा गुरूवारी भरदिवसा बोलेरो अंगावर घालून खून केला होता. याबाबत ब्रह्मदेव नाईकनवरे, सिद्धेश्वर नाईकनवरे यांच्यावर करकंब पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला होता. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. गुन्ह्यात वापरलेली जीप व्होळे (ता. पंढरपूर) परिसरातून ताब्यात घेतली. तर या प्रकरणातील मुख्य आरोपी ब्रह्मदेव नाईकनवरे यांना पंढरपूर तालुक्यात शुक्रवारी पहाटे अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


आरोपीला अटक केल्यानंतर पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. सोनवलकर यांच्यासमोर हजर केले. त्यावेळी पोलिसांनी आरोपीने केलेल्या गुन्ह्यापूर्वी मागील तीन दिवसांपासून आरोपीची पत्नी, मुलगा, त्या मुलाची दुसरी पत्नी यांना जाणूनबुजून फरार केले आहे. या खुनामध्ये या तिघांचा कितपत सहभाग आहे, कट कसा केला, तो अंमलात कसा आणला याबाबत तपास करावयाचा आहे.

शिवाय गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी त्याने गुन्हा घडल्यानंतर व्होळे परिसरात का नेऊन सोडली, त्या परिसरातील काही व्यक्ती यामध्ये सामील आहेत का, याबाबतचा तपास करावयाचा आहे, आरोपी हा उडवा उडवीची उत्तरे देत असून खरे सांगत नाही, याचा आणखी तपास करण्यासाठी पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी तपास अधिकारी सपोनि निलेश तारू यांनी मागणी केली. त्यावर न्यायदंडाधिकारी ए. एस. सोनवलकर यांनी १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील एम. एम. पठाण तर आरोपीतर्फे ॲड. सागर आटकळे, ॲड. सुहास कदम आदींनी काम पाहिले.

Leave a Reply

error: Content is protected !!