देविदास उर्फ दासू पाटील यांच्या खून प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पंढरपूर : ईगल आय न्यूज
पटवर्धन कुरोली येथे मागील भांडणाचा राग मनात धरून बोलेरो जीप अंगावर घालून चिरडून ठार मारल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली आहे. देविदास दिगंबर नाईकनवरे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्याच नात्यातील दोन आरोपींविरोधात करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीर पर्यंत सुरू होती.
मयत देविदास नाईकनवरे यांच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असून त्यांना भाऊ नसल्याने देविदास हे त्यांच्या कुटुंबातील एकटेच करते – धरते होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले आहेत. गावात दासू पाटील या नावाने परिचित असलेल्या एका कर्तबगार व्यक्तीच्या मृत्यूने पटवर्धन कूरोली परिसरात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मयत देविदास नाईकनवरे यांचे चुलत भाऊ पांडुरंग भगवान नाईकनवरे ( वय ४७ वर्ष, रा.पटवर्धन कुरोली ता. पंढरपूर ) यांनी करकंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनुसार, मयत देविदास दिगंबर नाईकनवरे ( वय ४३ वर्षे ) याची भाची प्रियंका पोपट पवार हीचा विवाह सिध्देश्वर ब्रम्हदेव नाईकनवरे ( रा. पटवर्धन कुरोली ) याच्यासोबत सात वर्षा पूर्वी झालेला होता. प्रियंका हिला रानातले काम जमत नसल्याने तिचे सासु – सासरे व नवरा हे तिला नेहमी अवमानकारक बोलत, शिवीगाळ करीत, वेळ प्रसंगी मारहाणही करत असत. एके दिवशी प्रियांकाला तिचे सासु, सासरे व पती यांनी खुप मारहाण केल्याने तिला देविदास याच्या घरी आणले होते. त्यानंतर देविदास व चुलत भाऊ सचिन औदुंबर नाईकनवरे यांनी प्रियंकाच्या सासरी जावुन प्रियंकाला का मारहाण केली याचा जाब विचारत सासरा ब्रम्हदेव व प्रियांकाचा नवरा सिध्देश्वर यांचे सोबत हाणामारी झाली होती. तेव्हा पासुन ब्रम्हदेव नाईकनवरे हे देविदास व सचिन यांचेवर डूख धरुन होते. तसेच ब्रम्हदेव व सिध्देश्वर याने अनेक वेळा प्रियांकाला सोडचिटटी देण्याची मागणी करून देविदासला असाच मुंगीसारखा चिरडून टाकील, असाही इशारा दिला होता.
गुरुवार ( दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी दहाच्या सुमारास देविदास नाईकनवरे हे मोटरसायकल (एम एच १३ सी एक्स ९६४१) वरून त्यांच्या घराकडे निघाले असताना ब्रम्हदेव नाईकनवरे यांने त्याच्या बोलेरो गाडी क्रमांक ( एम एच १३ डी एन ८९८४ ) ने पाठीमागून वेगाने येऊन देविदास यांच्या दुचाकीला धडक दिली आणि खाली पाडून शंभर ते दोनशे फुट फरफटत नेले. गाडी पुन्हा वळवून आणत पुन्हा देवीदासच्या अंगावर घातली आणि न थांबता निघून गेले. जखमी अवस्थेत देवीदास नाईकनवरे याना चारचाकी कारगाडीमध्ये टाकून पंढरपूर येथिल खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वी मयत झाल्याचे सांगितले.
यावरून ब्रम्हदेव संपत्ती नाईकनवरे व त्याचा मुलगा सिध्देश्वर नाईकनवरे यांनी मिळून देविदास नाईकनवरे यांच्या अंगावर बोलेरो गाडी घालून त्यास ठार मारले आहे, अशा स्वरूपाची लेखी फिर्याद पांडुरंग नाईकनवरे यांनी करकंब पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यावरून आरोपी ब्रह्मदेव नाईकनवरे आणि सिध्देश्वर नाईकनवरे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती करकंब पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक निलेश तारु यांनी दिली आहे.