खा.स्वामींची महापूर आणि अतिवृष्टी बाधितांकडे पाठ

मात्र आमदार प्रणिती शिंदे पाहणीसाठी सरसावल्या

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांनी पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यातील महापूर, अतिवृष्टी आणि घाट कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पीडितांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान , आम. प्रणिती शिंदे यांनी मात्र मोहोळ तालुक्यातील अनेक पुरग्रस्त गावांना भेटी देऊन नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन तरी दिले आहे. त्यामुळे आमचे खासदार कुठे हरवले असा सवाल मतदारसंघातील जनता विचारत आहे.

पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ या तिन्ही तालुक्यातुन भीमा नदी वाहते आणि महापुराने तीनही तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करन्यासाठी तरी किमान स्वामी येतील अशी अपेक्षा होती. तसेच पंढरीत घाटाची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला त्या कुटुंबाकडे ही स्वामींनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे मतदारसंघातील जनतेच्या अडी – अडचणी, समस्यांशी स्वामींना काही देणे घेणे नसल्याचे मानले जात आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात गेल्या वर्षी खा जयसिद्धेश्वर स्वामी हे निवडून आले. त्यावेळे पासून मतदारसंघात स्वामी फिरकलेच नाहीत. या दरम्यान आलेल्या दोन्ही वेळच्या पूरस्थिती, कोरोनाचे संकटातही स्वामी यांनी पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ तालुक्याकडे दुर्लक्ष केले आहे. चार दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या दौऱ्यात फक्त स्वामींचे दर्शन झाले. त्यानंतर स्वामी परत गायब झाले आहेत.

दरम्यान, सोलापूर शहरातील विधानसभा मतदारसंघाच्या आमदार असूनही आ. प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यातील अनेक गावांत जाऊन अतिवृष्टी, महापुराच्या नुकसानीची पाहणी केली, तसेच लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली आहे. मोहोळ तालुक्यातील या बाधित गावांत खासदार स्वामी किंवा त्यांचा कोणी प्रतिनिधी सुद्धा आलेला नाही. त्यामुळे खा स्वामी यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!