पंधरा दिवसांत नाही मिळाल्यास घरांचा ताबा घेणार
प्रतिनिधी : पंढरपूर
शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरांसाठी ज्यांनी पैसे भरले आहेत, त्याना येत्या पंधरा दिवसांत घरे नाही मिळाली तर लाभार्थ्यांना सोबत घरांचा ताबा घेतला जाईल, असा ईशारा मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिला आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत धोत्रे यांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करीत ईशारा दिला आहे.
या पत्रकार परिषदेला मनसेचे शशिकांत पाटील, जयवंत भोसले, संतोष कवडे आदींसह प्रधानमंत्री आवास योजनेत पैसे भरलेले लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फोटो प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांसह मनसे नेते दिलीप धोत्रे.
यावेळी धोत्रे म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनासाठी शहरातील सुमारे 150 हुन अधिक नागरिकांनी बँकेचे कर्ज काढून, खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेऊन 10 हजार ते साडे पाच लाख रुपये भरलेले आहेत. नोव्हेंबर 2021 पर्यंत या घराचा ताबा देऊ असे पालिकेकडून सांगण्यात आले होते. मात्र दुसरा नोव्हेंबर जवळ आला तरीही या नागरिकांना घरे मिळत नाहीत.
सोलापूर शहरात याच योजनेतील घर साडेपाच लाख रुपयांना मिळत आहे. मात्र पंढरपूर मध्ये नगरपालिकेने जागा दिलेली असताना ही येथील घराची किंमत साडे आठ लाख रुपये केली आहे. याची तक्रार घेऊन आपण लाभार्थ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत असा इशारा देऊन येत्या 15 दिवसांत या लाभार्थ्यांना घरे मिळाली नाहीत तर त्यांना सोबत घेऊन या घरांचा ताबा घेऊ अशी घोषणा धोत्रे यांनी यावेळी केली.