पंढरीत बंदोबस्तास येणाऱ्या पोलिसांची नियमित तपासणी होणार


पंढरपूर : ईगल आय मीडिया
आषाढी यात्रा होणार नसली तरीही यात्रेच्या दरम्यान पंढरपुरात बंदोबस्ताकरिता येणाऱ्या बाहेरील पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्याच बरोबर जो पर्यंत बंदोबस्त आहे तोपर्यंत नियमित तपासणी केली जाणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा महाराष्ट्रातील सांस्कृतिक सोहळा मानली यात्रा स्थगित केलेली आहे. देहू, आळंदी हुन येणाऱ्या संतांच्या पालख्यासुध्दा थेट हेलिकॉप्टरने येणार आहेत . यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. सागर कवडे म्हणाले कि, पंढरीत आषाढी यात्रा भरणार नसली तरीही बाहेरून कोणी कोरोना संक्रमित रुग्ण येऊ नये याकरिता जिल्हा, तालुका आणि शहर सीमा अशी पंढरपूरची तिहेरी नाकाबंदी केली जाणार आहे. पंढरपूर शहरातही १५ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. त्याकरिता १ हजारपेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त मागवला आहे. हा बंदोबस्त कोल्हापूर विभागातील असला तरीही पोलीस कर्मचारी कोरोना बाधित नसल्याची खात्री करण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या पोलिसांची आल्यानंतर संपूर्ण वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर बंदोबस्त काळात त्यांची नियमित तपासणी होणार आहे.


पंढरपूर शहरात आजवर स्थानिक नागरिक कोरोना बाधित आढळलेला नाही. बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे कोरोना विषाणू येणार असल्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने यात्रा स्थगित करून बाहेरून येणाऱ्या भाविकांना पंढरीत येण्यास मनाई केली आहे.
आषाढी यात्रेचे पारंपरिक नित्योपचार , यात्रेतील सर्व रीती रिवाज पार पाडले जाणार आहेत. त्यामुळे आषाढी यात्रा भाविकांसाठी स्थगित असली तरी यात्रेची परंपरा मात्र कायम राहणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!