80 वर्षांवरील जेष्ठांसाठी टपाली मतदान सुविधा

जेष्ठ आणि दिव्यांग सुमारे 15 हजार 500 मतदार

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपूर विधानसभा पोट निवडणूकसाठी  १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. कोरोनाच्या आजाराच्या संसर्गामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरीक, दिव्यांग तसेच कोविड बाधित रुग्णांना टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून, निवडणुकीसाठी मतदार संघात  13 हजार 688  ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरीक तसेच 1 हजार 782 दिव्यांग मतदार  असल्याची असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.


 पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची  निवडणुक  कोरोना संसर्गाच्या कालावधीत होत असल्याने निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी  ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरीक व  दिव्यांग या पोस्टल मतदारासांठी घरोघरी जावून पोस्टल मतदान अर्ज वाटप करण्यास सुरुवात केली आहे सर्व अर्जावर मतदारांचे नाव, मतदान यादी क्रमांकासह छपाई करण्यात आली आहे. यावर मतदारांनी स्वाक्षरी करुन भ्रमणध्वनी क्रमांक लिहावयाचा आहे. घरोघरी जावून भरलेले अर्ज संकलित करण्यात येणार आहेत.

दिव्यांग मतदारांनी त्यांचे दिव्यांग असल्याबाबतचे अधिकृत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुशिल बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली 10 अधिकारी व कर्मचारी यांचे पथक नेमण्यात आले आहेत. तसेच पंढरपूर व मंगळवेढा तहसिल कार्यालय या दोन ठिकाणी इच्छेनुसार टपाली मतदान  केंद्राची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले. 


 या  मतदान  प्रक्रियेसाठी  निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रक्रीयेस मंजुरी मिळाल्यानंतर तीन दिवसांची तारीख मतदानासाठी जाहिर करण्यात येणार आहे. मतदारांना टपाली मतदानासाठी मतदान केंद्रात मतदारांना  सोयीनुसार मतदान करता येणार आहे.  यासाठी उमेदवारांना मतदान केंद्रावरती बुथ एजंट नेमता येणार आहेत. तसेच मतदारांची खात्री करण्यासाठी केंद्रीय सुक्ष्म निरिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी सांगितले. 


लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारसंघातील ऐंशी वर्षावरील जेष्ठ नागरीक, दिव्यांग मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन  निवडणूक निर्णय अधिकारी गुरव यांनी यावेळी केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!