चिंचणीत प्रिसीजन फाऊंडेशन ने दिलेल्या 17 एच पी सौर ऊर्जा यंत्रणेचा शुभारंभ
पंढरपूर : ईगल आय मीडिया
एक पद एक वृक्ष ही नवीन संकल्पना सोलापूर जिल्हा परिषद राबवणार आहे. आम्ही सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी मिळून सर्व 20 हजार झाडे लावण्याचा आणि, ती झाडे जगवण्याचा ही संकल्प करीत आहोत. चिंचणी या गावाच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी काम केले त्या सर्वांचे अभिनंदन असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
चिंचणी ( ता.पंढरपूर ) गावात पर्यावरण प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने पाणी पुरवठा विहीरीसाठी 24 लाख रुपये खर्चून 17 अश्वशक्ती चा सोलर संच भेट देणेत आला. त्या सोलर संचाचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा आज ( मंगळवारी ) संपन्न झाला. यावेळी पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे समनव्वयक सचिन जाधव, जिल्हा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष मोहन अनपट, पिराची कुरोलीच्या सरपंच श्रीमती शेख आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी प्रमुख पाहुण्यांनी गावात फिरून गावातील वृक्ष लागवड, संगोपन, अभ्यासिका, जिप शाळा, स्मशानभूमी, ग्रामपंचायत इमारत, विश्रामगृहाची पाहणी केली. संपूर्ण गावाची पाहणी केल्यानंतर सर्वच पाहुण्यांनी गावचे कौतुक केले.
मेढा ते माढा खडतर प्रवास !
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सातपुते म्हणाल्या की, सोलर संच शुभारंभ साठी इथं आलो,मात्र खूप छान वाटलं. दुसरं सातारा अनुभवायला आलं. मेढा ते माढा (लोकसभा, विधानसभा मतदार संघ) प्रवास खडतर आहे. महाबळेश्वरला जाताना निसर्ग पाहण्यासाठी मेढा मार्गे जायचे. निसर्गाने साताऱ्यात जी किमया केली आहे. तीच किमया चिंचणी येथे माणसांनी हाताने केली आहे. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, असे वाटल्याने तुमच्या कार्यासमोर हात जोडावेसे वाटतात. असे म्हणत जिल्हा पोलिस प्रमुखांनी, गावच्या कोरोना मुक्तीचे ही कौतुक केले. गावात 400 पेक्षा जास्त लोक असताना एकही कोरोना रुग्ण नाही.गावातील अभ्यासिका, शाळा, विश्रामगृह पाहून समाधान वाटलं. तुमचं गाव नैसर्गिक रित्या खूप श्रीमंत आहे. ही श्रीमंती अशीच वाढत राहो. कष्टाच्या रूपाने तुम्ही समाजाला खूप काही दिले आहे. मीही असेच काही तर माझ्या गावी करण्याचा प्रयत्न करेन अशी भावना यावेळी सातपुते यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना प्रिसीजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ सुहासिनी शहा म्हणाल्या की, या गावाबद्दल खूप ऐकलं होतं. इथं येऊन खूप बरं वाटलं, स्वप्नांतल्या, पुस्तकात वाचल्यासारखं गाव आहे. साताऱ्यातून आल्यानंतर तुम्ही खूप कष्टाने, जिद्दीने, एकीतून हे सगळं उभा केलं आहे. पुढच्या काळात आणखी काही करायचं आहे असा तुमचा संकल्प दिसतोय, त्या कामात आम्हाला सोबत काम करायचं आहे. चिंचणी हे स्वच्छ, सुंदर आहे. हे पर्यटनासाठी हे गाव खूप सुंदर आहे असे म्हणतात कौतुक करून शहा यांनी, सामूहिक शेती करा अशीही सूचना केली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी, चिंचणी ग्रामस्थांचे आणी प्रिसीजन कंपनीचे अभिनंदन केले. चिंचणी या गावाचे नाव ऐकून होतो, तुम्हा ग्रामस्थांची कोरोना मुक्त आणि निसर्ग युक्त राहण्याची धडपड आहे. केंद्रीय गरमस्वराज्य मंत्रालयाने ही गावाची दखल घेऊन ट्विटर हँडलवर उल्लेख केला. संत तुकडोजी महाराजांच्या ग्राम गीतेची आठवण या गावात आल्यानंतर आली. तुकडोजी महाराजांना जे अपेक्षित होते ते सर्व चिंचणीकरांनी करून दाखवल्याचे सांगून, स्वामी यांनी प्रिसीजन कंपनीने 17 एच.पी. ची यंत्रणा बसवण्यासाठी 24 लाख रुपये खर्च केला आहे. गावासाठी प्रिसीजनने मोठे दान दिलेले आहे, त्याबद्दल प्रिसीजन चे आभार व्यक्त केले. संपूर्ण देशात आपले राज्य सौर ऊर्जा निर्मितीत चौथ्या नंबरवर आहे. राज्यात महाऊर्जा मार्फत अशा प्रकारची सौर यंत्रणा बसवण्यासाठी 30 टक्के अनुदान आहे. ती बसवल्यानंतर अनेक वर्षे ही यंत्रणा काम करणार असून ही यंत्रणा फायदेशीर आहे, चिंचणीचा हा प्रकल्प पाहून जिल्ह्यात आणखी इतर गावांना प्रेरणा मिळेल आणि सौर ऊर्जा वापराची नवीन चळवळ सुरू होईल, असेही यावेळी स्वामी म्हणाले.
प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत शशिकांत सावंत यांनी तर प्रास्ताविक मोहन अनपट यांनी केले. सूत्रसंचालन समाधान काळे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते.