अन्यथा आत्महत्या करेन !

पूजा चव्हाण हिच्या वडिलांची उद्विग्नता

टीम : ईगल आय मीडिया

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर सुरू असलेल्या चर्चेमुळे व्यथित झालेल्या तिच्या वडिलांनी तिची आणि कुटुंबाची बदनामी थांबवण्याची विनंती केली आहे. लहू चव्हाण यांच्यावर खूप मोठा आघात झाला असून पूजाबाबत होत असलेल्या उलटसुलट चर्चांनी ते अस्वस्थ झाल्याचे पाहायला मिळाले. त्यातूनच आमची बदनामी थांबवली नाही तर मी आत्महत्या करेन, असा उद्वेगच लहू चव्हाण यांनी व्यक्त केला.

पूजा चव्हाणच्या वडिलांनी ज्या भावना माध्यमांपुढे व्यक्त केल्या आहेत पूजाने केलेला संघर्ष, पोल्ट्री व्यवसायाच्या उभारणीसाठी तिने केलेली धडपड या सर्वावर प्रकाश टाकताना आपली कुणाबद्दल तक्रार नसल्याचेच सांगण्याचा त्यांनी एकप्रकारे प्रयत्न केला. पूजाच्या आत्महत्येनंतर कथित ऑडिओ क्लिप सध्या चर्चेत आहेत. यात ठाकरे सरकार मधील मंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी नाव घेऊन आरोप केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पूजाचे वडील लहू यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.

कृपा करून आमची आणखी बदनामी करू नका. आमचे अर्धे कपडे काढलेच आहात. आता उरलेले कपडे तरी काढू नका. नाहीतर मलाही आत्महत्येचा मार्ग निवडावा लागेल, असा उद्वेग व्यक्त केला. माझी लेक खूप चांगली होती. लोक तिला नाहक बदनाम करत आहेत आणि मी हे कुणाच्याही दबावाखाली बोलत नाही, असेही लहू यांनी स्पष्ट केले.

‘पूजाशी माझं नियमित बोलणं व्हायचं. ज्या दिवशी ही घटना घडली त्यादिवशीही मी पूजाशी बोललो होतो. तुला पैसे हवेत का, अशी विचारणा मी तिला केली. त्यावर ती नको म्हणाली होती. नंतर रात्री दोनच्या सुमरास तिच्या मित्राचा मला फोन आला. तिच्या डोक्याला मार लागल्याचं तो म्हणाला. ते ऐकून मला धक्काच बसला.

मी लगेचच पुण्याला जायला निघालो आणि सकाळी पुण्यात पोहचलो. पण मला तिचा मृतदेहच पाहावा लागला. तिथेच मला भोवळ आली. हा माझ्यासाठी खूप मोठा आघात होता’, असे लहू यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी सांगितले. पूजा गॅलरीत बसली होती. रात्री दीडच्या सुमारास ती गॅलरीतून खाली कोसळली. तिला चक्कर येत होती, असे तिच्या मित्राने मला सांगितले. असे असताना मी आरोप तरी कुणावर करू?, असा उलट सवालही त्यांनी केला.

पूजाने पोल्ट्री व्यवसायासाठी २५ ते ३० लाखांचे कर्ज घेतले होते. पोल्ट्रीचं बांधकाम करून प्रत्यक्षात व्यवसाय सुरूही झाला होता. मात्र लॉकडाऊन लागल्याने घात झाला. करोना संकटामुळे कोंबड्या फुकट वाटण्याची वेळ आमच्यावर आली. त्यात बर्ड फ्लूमुळे उरल्यासुरल्या आशाही मावळल्या. त्या तणावाखाली ती होती. मी तिला अनेकदा समजावले. माझ्या नावावर २५ लाखांची एलआयसी पॉलिसी आहे. त्यावर कर्ज काढू असं सांगितलं. चार-पाच लाखांचं कर्जही मिळालं. पण पूजा अस्वस्थच होती. त्यातून गावाकडे मन रमत नसल्याने ती पुण्याला गेली होती, अशी माहितीही लहू चव्हाण यांनी दिली.

Leave a Reply

error: Content is protected !!