पुणे बंडगार्डन येथील विसर्ग वाढला तर वीर मधील विसर्ग पुन्हा सुरू केला
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला तरीही पाण्याची आवक कायम असून बुधवारी दिवसभरात सुमारे 3 टक्के पाणी साठा वधारला आहे. उजनी धरण आता 62 टक्के ची पातळी गाठते आहे.
पुणे जिल्ह्यातील पाऊस थांबला असला तरी उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग चांगला असल्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढ कायम आहे. दरम्यान वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणारा विसर्ग बुधवारी सकाळी बंद करण्यात आला होता मात्र सायंकाळी त्यात वाढ करून तो 5 हजार 9 क्यूसेक्स करन्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी उजनी उणे 14 टक्केपर्यंत खालावले होते. परंतु यंदाच्या हंगामात धरण क्षेत्रात 490 मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस झाल्यामुळे उजनीतील पाणी साठा सातत्याने वधारत आला आहे. मागील पंधरा दिवसापासून पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांवर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे उजनीत येणाऱ्या पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे. त्यामुळे उजनीच्या पाण्यासाठ्यात वेगाने वाढ होत आहे. बुधवारी सकाळी आठ वाजता उजनीत येणारा निसर्ग पुणे बंडगार्डन येथे 12 हजार 421 एवढा होता, तर दौंड येथे हाच विसर्ग 16 हजार 350 क्यूसेक्स एवढा आहे. तर सायंकाळी बंडगार्डन येथील विसर्ग वाढला असून 13 हजार 830 क्यूसेक्स एवढा आहे. तर दौंड येथील विसर्ग कमी झाला असून तो 11 हजार 546 इतका झालेला आहे. त्यामुळे उजनी धरणातील पाण्याची वाढ कायम राहणार आहे. मंगळवार बुधवारी सकाळी आठ वाजता उजनीतील पाण्याचा साठा 59. 91% झाला होता, तर सायंकाळी 8 वाजता हाच साठा वाढून 61. 79 % इतका झाला होता. उजनी धरणाने पाणीसाठ्याची ‘ साठी ‘ पार केल्यामुळे यंदा धरण शंभर टक्के भरण्याची खात्री झालेली आहे.
वीरचा विसर्ग पुन्हा सुरू केला
नीरा नदीच्या खोऱ्यात मागील पंधरा दिवसात दमदार पाऊस झाल्यामुळे चारही धरणातील पाणीसाठा 90 टक्केच्या वर झाला आहे. त्याच बरोबर नीरा खोऱ्यातील पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धरणात येणारी आवक कमी झाल्यामुळे वीर धरणातून नीरा नदीला सोडण्यात येणार आहे निसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. मात्र सायंकाळी पुन्हा त्यात वाढ केली असून 8 वाजता 5 हजार 9 क्यूसेक्स ने पाणी नीरा नदीला सोडले आहे. वीज निर्मिती प्रकल्पासाठी 800 क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण पाहता वीर मधून पुन्हा पाणी सोडले जाऊ शकते अशी शक्यता नीरा उजवा कालवा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.