भीमा खोऱ्यात पाऊस रुसला

बहुतांश धरणांची पाणी पातळी गतवर्षीच्या तुलनेत कमी

पुणे जिल्ह्यातील कोणत्या धरणावर किती मिमी पाऊस पडला ते दर्शवणारा तक्ता !

टीम : ईगल आय मीडिया

मागील वर्षी धो धो बरसून भीमा खोऱ्यातील नद्यांना महापूर देणाऱ्या पावसाने यंदा मात्र पाठ फिरवली असल्याचे दिसते. जुलै चा 3 रा आठवडा संपत असूनही भीमा खोऱ्यावर पाऊस रुसल्याच दिसते. परिणामी उजनी धरण अजूनही उणे 4 टक्के पातळीला आहे. तर पुणे जिल्ह्यातील बहुतांश धरणे गतवर्षी च्या तुलनेत कमी भरलेली दिसतात.

या वर्षीचा मान्सून राज्यात वेळेवर आला असून भीमा नदीचे खोरे वगळता अन्य भागात मान्सून ने दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील धरणांची पाणी पातळी झपाट्याने सुधारली आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात आजअखेर समाधानकारक पाऊस झालेला आहे.

सोलापूर जिल्ह्यात सुद्धा सरासरीच्या 155 टक्के पाऊस या हंगामात आजवर झालेला आहे. मात्र जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणावर पाऊस रुष्ट झाल्याचे दिसते. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात 19 जुलै अखेर जेमतेम 238 मिमी पाऊस पडला आहे. तर भीमेच्या खोऱ्यातील 22 धरणांवर ही पावसाने हात आखडता घेतला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुणे जिल्ह्यातील सर्व धरणांवर कमी पाऊस झालेला आहे. त्यामुळे सर्व धरणांची पाणी पातळी गत वर्षी पेक्षा कमी आहे. उजनी धरणात गेल्या वर्षी आजच्या तारखेला 60 टक्के इतका पाणी साठा होता.

मात्र यंदा अजूनही धरण उणे 4 टक्के एवढे आहे. निरेच्या खोऱ्यात मात्र समाधानकारक पाऊस असला तरीही गेल्या वर्षी पेक्षा तिथेही कमी पाऊस आहे. उर्वरित काळात किती पाऊस पडतो आणि धरणे कधी भरतात याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!