पुणे विभाग शिक्षक मतदार संघ : काँग्रेसचे जयंत आसगावकर विजयी

अपक्ष दत्तात्रय सावंत दुसऱ्या तर भाजपचे पवार तिसऱ्या स्थानी

उमेदवार निहाय मिळालेले अंतिम मतदान

टीम : ईगल आय मिडिया

पुणे विभागीय शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. जयंत दिनकर आसगावकर विजयी झाल्याचे शुक्रवारी रात्री उशीरा निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जाहीर केले. तसेच आसगावकर यांना निवडीचे प्रमाणपत्र दिले. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपचे उमेदवार जितेंद्र पवार हे तिसऱ्या स्थानी राहिले आणि त्यांना पडलेल्या एकूण मतांपेक्षा तिप्पट मते आसगावकर यांना मिळाली आहेत. तर अपक्ष दत्तात्रय सावंत याना6 दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात यावर्षी 72 टक्के मतदान झाले होते. गुरुवारी सुरू झालेली मतमोजणी शुक्रवारी रात्री उशिरा पूर्ण झाली. पहिल्या पसंती क्रमाचा कोटा कोणीही पूर्ण केला नसल्याने दुसऱ्या, तिसऱ्या पसंती क्रमाची मतमोजणी करण्यात आली. यामध्ये, काँग्रेसचे जयंत आसगावकर यांना 25 हजार 985 मते मिळाली. 25 हजार 114 मतांचा कोटा होता. या मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे श्री. आसगावकर यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आले.

तर अपक्ष उमेदवार आणि विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत यांना 15 हजार 357 मते मिळाली. भाजप पुरस्कृत शिक्षक परिषदेचे उमेदवार जितेंद्र पवार यांना 7 हजार 294 मतांवर समाधान मानावे लागले. लोकभारती चे गोरखनाथ थोरात यांना 5 हजार 306, प्रा. प्रकाश पाटील यांना 2 हजार 758 मते मिळाली.

पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले, पदवीधर मतदार संघातून एकूण 62 उमेदवार तर शिक्षक मतदार संघातून 35 उमेदवार निवडणूक लढवीत होते. निकाल जाहीर केल्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी जयंत आसगावकर यांना निवडीचे प्रमाणपत्र दिले.

Leave a Reply

error: Content is protected !!