पाऊस : पुणे जिल्ह्यावर रुसला तर सोलापूर जिल्ह्यात बरसला

उजनी प्लस तर पुणे जिल्ह्यातील धरणे गतवर्षीच्या तुलनेत मायनसमध्ये

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेले उजनी धरण शनिवार ( दि.18 ) रात्री ९ वाजता मायनस पाणीसाठ्याची पातळी ओलांडून प्लासमध्ये आले आहे. मात्र त्याच वेळी गतवर्षीच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे यावर्षी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने पाऊस पुणे जिल्ह्यावर रुसला तर सोलापूर जिल्ह्यावर बरसला असल्याचेही दिसून येते.

उजनी धरणातील पाणीसाठा पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावर अवलंबून असतो. उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात असल्यामुळे या धरणाचे बॅक वॉटर चा परिसर अहमदनगर, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग अवर्षणग्रस्त आहे. दर वर्षी या परिसरात पावसाचे प्रमाण कमी असते, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील धरणे 70 ते 80 टक्के भरल्यानंतरच उजनी धरणामध्ये पाणी सोडले जाते.दरवर्षी जुलैअखेर पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु होतो, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उजनीतील पाणी साठ्याकडे जूनपासूनच लक्ष लागलेले असते. यंदा मात्र चित्र काहीसे बदलले असून सोलापूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडतो आहे. त्याचबरोबर उजनी धरणाच्या ‘ बॅकवॉटर परिसरात ‘ गेल्या वर्षीच्या तुलनेत खूप चांगला पाऊस पडलेला आहे. गेल्यावर्षी 18 जुलै अखेर उजनी धरणावर केवळ 71 मिलिमीटर इतका पाऊस पडला होता, तर यंदा 18 जुलै अखेर 300 मिलिमीटर इतका मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळेच उजनी धरण उणे 35 टक्के वरून शनिवारी रात्री नऊ वाजता प्लस पातळीकडे वाटचाल करत आहे. त्यातुलनेत पुणे जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा मात्र खूपच कमी असल्याचे दिसून येते. यावर्षी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर अपेक्षेनुसार किंवा दरवर्षी प्रमाणे पाऊस पडलेला नसल्याने पुणे जिल्ह्यातील लहान मोठ्या 21 धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत अत्यल्प आहे. यंदा एकही धरण मागील वर्षी पेक्षा जास्त भरलेले नाही.त्याच बरोबर गेल्यावर्षीपेक्षा यंदा या सर्व धरणावरील पाऊस तीस ते पस्तीस टक्के कमी प्रमाणात पडल्याचे आकडेवारी सांगते.

गेल्यावर्षी पुणे जिल्ह्यातील टेमघर, मुळशी, वरसगाव,पानशेत, पवना, वडिवळे आदी धरणावर 1100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस पडला होता. मात्र यंदा एकाही धरणावर 900 मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला नाही. बहुतांशी धरणावर यावर्षी सरासरी 300 ते 400 मीटर इतकाच पाऊस पडल्याने पुणे जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत खूपच कमी आहे. यावर्षी पुणे जिल्ह्यातील कासारसाई व भामा-आसखेड ही दोनच धरणे 40 टक्केपेक्षा अधिक भरलेले आहेत, तर बाकी सर्व धरणे 20 ते 30 टक्के या पातळीत आहेत. त्याचवेळी गत वर्षी 18 जुलै रोजी कळमोडी धरण 100 टक्के भरले होते, तर वडिवळे,आंध्रा,कासारसाई, खडकवासला ही धरणे 80 ते 90 टक्के एवढया पाणीसाठ्यामध्ये होती. एकंदरीत पावसाची परिस्थिती पाहिली असता यंदा तो पुणे जिल्ह्यावर रुसला असल्याचे तर दुष्काळी सोलापूर जिल्ह्यावर मनसोक्त बरसला असल्याचे दिसून येते.

उजनी धरण 18 जुलै 2019 रोजी पुणे 26 टक्के या पाणीपातळीला होते, मात्र यंदा धरणांनी शनिवारी प्लसची पातळी गाठली आहे.
असे असूनही पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्याशिवाय उजनी धरण 100 भरणे शक्य नाही. त्यामुळे अजुनही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष अजूनही पुणे जिल्ह्यातील धरणाचा पाणीसाठा व पाऊस याकडेच लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!