13 धरणांवर केवळ 1 अंकी पावसाची नोंद
पुणे : ईगल आय मीडिया
पुणे जिल्ह्यातील पावसाने विश्रांती घेतल्याने पाऊस आणि धरणातील पाणी साठ्याची चिंता वाढली आहे. शनिवारी पुणे जिल्ह्यात 13 धरणावर अत्यल्प म्हणजेच 1 अंकी मोजता येईल एवढा पाऊस झाला. 4 धरणावर तर पाऊसच झाला नाही. त्यामुळे उजनीत येणारा पाण्याचा प्रवाह मंदावला आहे.
गेल्या 4 दिवसात पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसाचा जोर आता पूर्णपणे ओसरला असून 19 पैकी 13 धरणांवर 0 ते केवळ 9 मिमी पाऊस पडला आहे. येडगाव, वडज,घोड,विसापूर या धरणावर तर पूर्णपणे उघडीप घेतली असून एक मिमी सुद्धा पाऊस झाला नाही. टेमघर धरणावर 40 मिमी सर्वाधिक पाऊस झाला आहे. मात्र एकूण पावसाचे प्रमाण कमालीचे घटल्याने उजनीत येणारा पाण्याचा विसर्ग घटला आहे. रविवारी सकाळी उजनी धरणातील पाणी साठा 24 . 11 टक्के इतका झाला आहे.
दौंड येथून येणार पाण्याचा विसर्ग 7 हजार 940 क्यूसेक्स पर्यंत घटला आहे. उजनी धरणावर ही गेल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली आहे त्यामुळे धरनातील पाणी साठ्याची चिंता वाढली आहे.