ऑगस्ट अखेर पाऊस मारणार दांडी ?

राज्यातील सर्व प्रकल्पांतील एकूण साठा गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्क्य़ांनी कमी आहे.

टीम :  ईगल आय मीडिया

संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यात सर्वच विभागात पावसाने ओढ दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी चार ते पाच दिवस तरी राज्यात कुठेही मोठय़ा पावसाची शक्यता नाही. पावसाला पोषक स्थितीचे संकेत सध्या कुठेही नाहीत. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन ते सरासरीच्या पुढे गेले आहे.तसेच राज्यातील पाणीसाठ्यात गत वर्षीच्या तुलनेत 14 टक्के तूट दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात बहुतांश ठिकाणी मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे राज्यातील पंधरा जिल्ह्य़ांत सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली.

पावसाने ओढ दिल्याचा परिणाम राज्यातील पाणीसाठय़ावरही झालेला दिसून येत आहे. राज्यातील सर्व प्रकल्पांतील एकूण साठा गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्क्य़ांनी कमी आहे. अमरावती, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद विभागांमध्ये पाण्याबाबत चिंता वाढत आहे. मराठवाडय़ात हिंगोली वगळता इतर सर्व जिल्ह्य़ांमध्ये पावसाने सरासरी पूर्ण केली असली, तरी विभागातील धरणांमध्ये मात्र गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्य़ांनी पाणीसाठा कमी आहे.


राज्य्या्च्या धरणातील विभागवार पाणीसाठा
विभाग                  गतवर्षी          सध्या
अमरावती         ७०.२२ टक्के      ५८.३ टक्के
औरंगाबाद       ६०.५६ टक्के       ४०.४९ टक्के
कोकण            ८१.१६ टक्के      ७९.४८ टक्के
नागपूर             ७१.१८ टक्के      ४८.१ टक्के
नाशिक           ६९.८६ टक्के        ४९.१६ टक्के
पुणे                  ८१.८ टक्के        ७३.५ टक्के

मराठवाडय़ाच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या या प्रकल्पात गतवर्षी याच कालावधीत ८० टक्क्य़ांहून अधिक पाणीसाठा होता. तो सध्या ४१ टक्क्य़ांवर आहे. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. राज्यातील सर्व धरणांमध्ये गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण सुमारे ७४ टक्के पाणीसाठा होता. तो सध्या ६० टक्क्य़ांवर आहे. यंदा जून आणि जुलै महिन्यातील काही ठरावीक दिवशी तीव्र मुसळधार पाऊस झाल्याने पावसाने ३ महिन्यांची सरासरी ओलांडली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कमी पाऊस पडत असल्याने धरणांतील पाणी साठा संथगतीने वाढत आहे.


मोसमी पावसाच्या हंगामात सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये राज्यात बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, या कालावधीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत मोठय़ा पावसाची नोंद झाली.

ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात राज्यात सर्वच विभागात पावसाने ओढ दिली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी चार ते पाच दिवस तरी राज्यात कुठेही मोठय़ा पावसाची शक्यता नाही. त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!