उजनीतून पाणी अचानक का सोडले ?

उजनी प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यांच्यावर कारवाईची राजू शेट्टी यांची मागणी

पंढरपूर : ईगल आय मीडिया

हवामान खात्याने अगोदर ईशारा देऊनही उजनीतून अचानक पाणी का सोडले ? धरणातून थोडे थोडे पाणी अगोदर सोडून धरणात पाण्यासाठी जागा करता आली असती. मात्र अचानक पाणी सोडून महापूर आणला. पाटबंधारे विभाग, आपत्ती व्यवस्थापन यांच्यावर कारवाई व्हावी अशी जोरदार मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी केली आहे.

या बातमीचा व्हीडिओ पहा आणि चॅनेल subscribe करा

शेट्टी हे महापूर, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना उजनी व्यवस्थापनावर ताशेरे ओढले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, धनंजय पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना शेट्टी म्हणाले की, अतिवृष्टीचा ईशारा अगोदर देऊनही धरणातून अचानक एवढे पाणी का सोडले ? अगोदर कोणतीही पूर्व सूचना दिली नाही. आपत्ती व्यवस्थापन बेजबाबदार वागले आहे. यामुळे महापूर आला असून लोकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या संदर्भात उजनी व्यवस्थापन, पाटबंधारे विभाग जे कोणी असतील त्यांची चौकशी केली जावी. यांच्यावर जर कारवाई होणार नसेल तर हे पांढरे हत्ती कशासाठी पोसायचे असाही सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला. आजच सोलापुरात मुख्यमंत्र्यांनी उजनीच्या पाण्यासंदर्भात चौकशीचे सूतोवाच केले आहे.

त्यामुळे महापूर हाताळण्यात अपयशी आणि या संकटाशी जबाबदार असलेल्या व्यवस्थापनातील पांढऱ्या हत्तीचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

error: Content is protected !!