डिसले सरांचा जागतिक सन्मान अभिमानास्पद : विरोधी पक्षनेते दरेकर


रणजितसिंह डीसले यांचा दरेकर यांनी घरी जाऊन केला सन्मान


सोलापूर : ईगल आय मीडिया

जागतिक पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांना मिळालेला पुरस्कार व सन्मान हा प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाने मान उंचावणारा आहे. इतर शिक्षकांनी त्यांचा आदर्श घ्यावा अशी त्यांची कामगिरी आहे, असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज काढले.


युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिला जाणारा जागतिक स्तरावरील ७ कोटी रुपयांचा ‘ग्लोबल टीचर पुरस्कार’ सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक शरणजितसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. त्यानिमित्त विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी बार्शी येथे रणजीतसिंह डिसले यांच्या घरी जाऊन त्यांच्यासह कुटुंबीयांचा व त्यांच्या आईवडीलांचा सन्मान केला.


जिल्हा परिषदेचे शिक्षक अनेक अडचणींना सामोरे जात काम करीत आहेत. परतुं अतिशय प्रतिकुल परिस्थितीत डिसेल यांना मिळालेला जागतिक पुरस्कार हा सर्वच शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारातून इतरांनी प्रेरणा घ्यावी आणि काम करावे, असेही दरेकर यांनी सांगितले.


दरेकर यांनी सांगितले कि, डिसले यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करत सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण मिळावे हा ध्यास घेऊन ज्ञानदानाचे काम केल्यामुळे त्यांची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली. जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावण्यासाठी ‘क्यू-आर’ कोड सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी अवलंब केला. एक चांगला संदेश डिसले सरांनी दिला.७ कोटींचा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यातला ५० टक्के वाटा हा जे अंतिम फेरीमधे शिक्षक आले होते त्यांच्यासाठी जाहिर केला आहे. हे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा याला साजेस असं कार्य त्यांनी केले आहे. आपण विधिमंडळामध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आणण्याची शिफारस सरकारकडे करु असेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

error: Content is protected !!