आ. रणजितसिंह मोहिते- पाटील यांचा शोक संदेश
पंढरपूर : ईगल आय मीडिया
कणखर नेतृत्व हाच समाजाचा आधार असतो . श्रीमंत सुधाकरपंत परिचारक यांच्या रुपाने सोलापुर जिल्ह्यातील राजकीय , सहकार क्षेत्रातला आधारवड आज दुर्देवाने कोसळला. त्यामुळे सोलापुर जिल्ह्याचे व विशेषत: मोहिते-पाटील परिवाराचे अपरिमित नुकसान झाले आहे अशा शब्दांत आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी जेष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सुधाकरपंत परिचारक यांचे सोमवारी रात्री उशिरा निधन झाले. त्यांच्या विषयी मोहिते पाटलांनी एक शोक संदेश दिला आहे.
या संदेशात आ. रजणीतसिंह पुढे म्हणाले की, सहकार महर्षीं सोबत राजकारणात असलेले सुधाकरपंत पुढे, पुढे मोहिते-पाटील परिवाराचे घटक बनले. महर्षींच्या खांद्याला – खांदा लावून सोलापुर जिल्ह्यातील अनेक संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापलट केला. महर्षींच्या निधनानंतर वडिलकीच्या नात्याने विजयदादांच्या पाठीशी खंबिरपणे उभा राहून, एक विचाराने जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक , सांस्कृतीक, सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले. या क्षेत्रातील निर्णय प्रकियेत सुधाकरपंतांचा ‘ शब्द ‘ विजयदादा व इतरांना मान्यच असायचा .
श्रीमंत परिचारकांचे प्रेम , आशिर्वाद कायम स्मरणात राहील.पंतांचे जिवन व कार्य आजच्या पिढीला दिपस्तंभासारखे आहे. अशा या कर्मयोगी, नेत्याला मोहिते-पाटील कुटुंबियांच्या वतिने भावपुर्ण श्रद्धांजली , असेही
आ रणजितसिंह मोहिते पाटील शोक संदेशात म्हणतात.