रेणू शर्मा ब्लॅकमेलर : भाजपच्या माजी आमदारांची पोलिसात तक्रार

टीम : ईगल आय मीडिया

रेणू शर्मा ही हनी ट्रॅप टाकून ब्लॅकमेल करणारी महिला असल्याचा गंभीर आरोप भाजपचे माजी आ. कृष्णा हेगडे यांनी केला असून आंबोली ( अंधेरी प.) पोलीस ठाण्यात रेणू शर्मा विरोधात तक्रार दाखल केली आहे.

रेणू शर्मा ही करुणा शर्मा यांची बहीण आहे. करुणा यांना धनंजय मुंडे यांच्यापासून दोन मुलं असून मुंडे यांनी ते मान्यही केलं आहे. मात्र, रेणू शर्मा हिनं केलेले इतर आरोप धनंजय मुंडे यांनी फेटाळले आहेत. मात्र, तिनं ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यामुळं मुंडे अडचणीत आले असून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडे यांच्यावरील आरोपांची गंभीर दखल घेतली असतानाच कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा हिच्याविरुद्ध तक्रार केल्याचं समोर आलं आहे. हेगडे यांनी अंधेरी पश्चिमेकडील आंबोली पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या महिलेविरुद्ध तात्काळ गुन्हा नोंदवून तिची सखोल चौकशी करावी व योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी हेगडे यांनी केली आहे.

आपल्या तक्रारीत कृष्णा हेगडे यांनी म्हटले आहे की, रेणू शर्मा ही महिला २०१० पासून मला फोन आणि मेसेज करत होती. तिच्याशी संबंध ठेवण्यासाठी माझ्या मागे लागली होती. माझा पाठलाग करण्यापर्यंत तिची मजल गेली होती. तब्बल पाच वर्षे ती मला संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. ९९८११११११२, ९८९२८१४७८, ०२२६६९३४४४४, ८४५४८ ०२२०८ या क्रमांकावरून तिनं मला कॉल केले. माझ्या सूत्रांकडून तिच्याबद्दल माहिती काढली असता ती एक लबाड व्यक्ती असल्याचं मला समजलं. त्यानंतर मी तिला भेटण्याचं पूर्णपणे टाळलं. तिला तसं स्पष्ट बजावलंही होतं. मला मिळालेल्या माहितीनुसार, तिनं काही पुरुषांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत.

इतकंच नव्हे, ८८२८२६५२८९ या क्रमांकावरून ६ आणि ७ जानेवारी २०२१ ला देखील तिनं मला व्हॉट्सअॅप मेसेज केले आहेत. मी ‘थम्ब’ इमोजी वगळता तिच्या मेसेजला प्रतिसाद दिला नाही. दोन दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर तिनं केलेल्या आरोपांनंतर मला धक्काच बसला. तेव्हाच मी तिच्याविरुद्ध तक्रार करण्याचा निर्णय घेतला. आज तिनं मुंडे यांना लक्ष्य केलं. कदाचित दोन वर्षांपूर्वी हीच वेळ माझ्यावर आली असती. उद्या कदाचित दुसरा कोणी त्याजागी असेल.

Leave a Reply

error: Content is protected !!