गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले संकेत
टीम : ईगल आय मीडिया
केंद्र सरकारनं राज्यांना राज्यातंर्गत आणि राज्याराज्यातील वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे राज्यातील वाहतूक विना निर्बंध सुरू होण्याची शक्यता असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तसे संकेत दिले आहेत.
देशभरात अनलॉक-३च्या टप्प्यात केंद्र सरकारनं देशातंर्गत प्रवासी व माल वाहतुकीवरील निर्बंध पूर्णपणे हटवले होते. मात्र, राज्यांनी करोनाचा धोका लक्षात घेऊन हे निर्बंध कायम ठेवले होते. त्याचा परिणाम अर्थचक्रावर होत असल्यानं शनिवारी केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यांना प्रवासी व माल वाहतुकीवरील निर्बंध हटवण्याचे निर्देश दिले.
केंद्रानं राज्यांच्या सचिवांना पत्र पाठवल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली. “वस्तू व प्रवासी राज्यातंर्गत व आंतरराज्यीय वाहतुकीवरील निर्बंध शिथिल केल्यासंदर्भात केंद्रानं अलिकडचे जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांची राज्य सरकारनं दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर जिल्हातंर्गत आणि आंतरराज्यीय वाहतुकीसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल,” असं अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
यावरून लवकरच राज्यातील प्रवास आणि वाहतुकीवरील निर्बंध हटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.