मुंबई : ईगल आय मीडिया
जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचं निधन झालं आहे. बुधवारी रात्री प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं, मात्र गुरुवारी सकाळी त्यांचं निधन झाल्याची माहिती महानायक अमिताभ बच्चन यांनी दिली. त्याच बरोबर ऋषी कपूर यांचे चिरंजीव अभिनेता रणवीर कपूर यानेही या दुःखद वृत्ताला दुजोरा दिला आहे. या दुःखद बातमी नंतर संपूर्ण बॉलिवूड शोकमग्न झाले असून, देशभरात ऋषी कपूर यांच्या निधनाबाबत दुःख व्यक्त होत आहे. 67 वर्षीय ऋषी कपूर हे 2018 पासून कर्क रोगाने आजारी होते, त्यांच्यावर लंडनमध्ये उपचार केल्यानंतर त्यांची तब्येत स्थिर होती.मात्र बुधवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली त्यामुळे त्यांना मुंबईत एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी अभिनेत्री नितुसिंग, त्यांचे बंधू रणधीर कपूर उपस्थित होते. मात्र गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. बिग शोमन राज कपूर यांच्या पोटी जन्म घेतल्याने ऋषिकपूर यांच्या रक्तातच अभिनय भिनला होता. बुधवारी सकाळी अभिनेता इरफान खान यांचे निधन झाले, त्यांच्या दुःखाचे चटके अजून बसत असतानाच ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी धडकली आहे. त्यानंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सर्व स्तरातून ऋषकपूर यांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त होत आहे.