एस. पी. स्कूलमध्ये माता पालक सभा संपन्न

जेईई, नीट परीक्षासाठी फाऊंडेशन कोर्स  महत्त्वाचा : प्रा. विशाल गरड


टीम : ईगल आय न्यूज


सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये जेईई, सीईटी, नीट  परीक्षा देणे ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांसोबत पालकांनीही त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, ग्रामीण भागात असूनही एस. पी. स्कूलमध्ये आठवीपासूनच फाऊंडेशन अभ्यासक्रम घेतला जात आहे, ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन प्रा. विशाल गरड यांनी केले. नांदोरे ता.पंढरपूर येथील एस. पी. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या माता – पालक सभेत प्रा. गरड बोलत होते. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पशुसंवर्धन विभागाचे माजी सहायक आयुक्त डॉ. नंदकुमार होनराव होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे, सचिव अश्वराज वाघ, खजिनदार विक्रम भिंगारे, सहसचिव बाळासाहेब चव्हाण, तज्ञ संचालक युवराज सातुरे, मुख्याध्यापिका एस. बी. चव्हाण, प्रकल्प संचालिका व्ही. एस. वलगे उपस्थित होते.


यावेळी बोलताना प्रा. गरड म्हणाले की, ज्या शाळांमधील विद्यार्थी शिष्यवृत्ती, एमटीएस अशा परीक्षांना बसतात आणि उत्तीर्ण होतात असेच विद्यार्थी भविष्यात जेईई, नीट परीक्षांद्वारे आपले स्वप्न पूर्ण करू शकतात. मुलांना केवळ नोकरी मिळावी यासाठी शिक्षण न देता आपला मुलगा शिक्षित, सुसंस्कृत होण्यासाठी शिक्षण दिले पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. संतोष वलगे म्हणाले की, एस. पी. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षेला तोंड देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे पहिलीपासूनच विशेष लक्ष दिले जात आहे. पाचवीसाठी नवोदय, स्कॉलरशिप, सैनिक या परीक्षांच्या तयारीसाठी स्वतंत्र तुकडी, तसेच आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्वतयारी करून घेण्यास संस्थेने प्राधान्य देऊन आठवीपासूनच फाऊंडेशन कोर्स चालू केले आहेत व यावर्षी अकरावी सायन्स वर्ग चालू केलेला असून अगदी सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांची जेईई, नीट व सीईटी ची तयारी करून घेतली जाईल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


या कार्यक्रमासाठी विजय मोहरे, शिवाजी लाडे, शालेय व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष पांडुरंग भिंगारे, उपाध्यक्ष नंदकुमार काटकर, उपमुख्याध्यापक सूरज अलगुडे, ज्युनिअर विभाग प्रमुख शहाजी साठे यांच्यासह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक साईनाथ कुंभार, अस्मिता भोसले यांनी केले. आभार सोमनाथ ढावरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले.

Leave a Reply

error: Content is protected !!