नातेपुते : ईगल आय मीडिया
मांडवे ता. माळशिरस येथील शेतकरी कुटुंबातील सदाशिव शंकर सांळुखे यांनी नुकताच सा. बां. (रस्ते) खात्याचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे. अत्यंत कष्टाळू, तितकेच कठोर शिस्तीचे सध्या राज्यात ‘हायटेक’ व प्रामाणिक अधिकारी असा ठसा असलेले लोकप्रिय अधिकारी सांळुखे साहेब या नावापेक्षा “सदा” म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहेत.
माळशिरस तालुक्यातील मांडवे या खेड्यात त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले आहे तर माध्यमिक शिक्षण नातेपुते येथील डॉ. बा.ज. दाते प्रशालेत झाले आहे. त्यांनी सांगली येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग ची पदवी घेतल्यानंतर त्यांची एमपीएससीतून कार्यकारी अभियंता क्लास १ अधिकारी म्हणून निवड झाली.
आपल्या सेवा काळात त्यांनी महाड, मंत्रालय, कोल्हापूर व पुणे (पुर्व विभाग) अधिक्षक अभियंता म्हणून नाशिक, कोल्हापूर येथे व मुख्य अभियंता म्हणून सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे येथे काम केले आहे. दि.१२ नोव्हेंबर २०२१ रोजी पदोन्नतीने रस्ते मंत्रालय मुंबई येथे सचिव या पदावर हाजर झाले आहेत. त्यांनी जेथे जेथे काम केले त्या प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे.
त्यांच्या प्रामाणिक कामाची पोचपावती म्हणूनच खास बाब म्हणून नाशिक कुंभमेळ्यात २ वर्षे अधिक्षक अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर १९९९ साली राज्य सरकारचा ” उत्कृष्ट अभियंता” म्हणून त्यांना गौरविण्यात आले होते.
मुख्य अभियंता सा. बां प्रादेशिक विभाग पुणे येथे कार्यरत असताना पुणे विभागातील ‘हायब्रीड अॅन्युटी’ अंतर्गत “आशियन डेव्हलपमेंट बँक” योजनेतून हजारो कोटी रुपयांचे रस्त्यांचे प्रकल्प मार्गी लावले.
“कोविड१९” अंतर्गत ससून रुग्णालयातील आॅक्सिजन पुरवठा करण्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करून दिले. त्यांच्या उत्तम कामामुळे व साध्या स्वभावामुळे ते सर्व कर्मचारी, अधिकारी व लोकप्रतिनिधी वर्गात अत्यंत लोकप्रिय अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. विशेष म्हणजे संपूर्ण सेवा कालात त्यांनी पोस्टींग साठी कधीच कोणत्याही मंत्र्याकडे शिफारस मागितली नाही. त्यांच्या या पदोन्नती मुळे संपूर्ण माळशिरस तालुक्यातील जनतेतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.