सहकार शिरोमणीची निवडणूक आली म्हणून अपप्रचार

 निधी मिळण्यास विरोधकांकडून अडथळे ! ऊस बील देण्यास बांधील : कल्याणराव काळे 

पंढरपूर : eagle eye news

  साखर कारखान्याचे गळीत हंगाम बंद झाले आहे. साखर विक्री आणि बँक कर्जातून निधी उपलब्ध करण्यासाठी आमचे अटोकाट प्रयत्न सुरु आहेत मात्र तथाकथीत राजकीय विरोधकांकडून संस्थेबददल अपप्रचार करुन निधी उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तरीही शेतकरी, कामगार व वाहतुकदारांची उर्वरीत देणी देण्यासाठी संचालक मंडळ बांधील असल्याचे, सहकार  शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव  काळे  यांनी सांगितले.


गुडी पाडव्याच्या दिवशी कारखान्याच्या प्रवेश द्वारावर विरोधी गटाकडून आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्काभूमीवर  काळे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे आपली भूमिका मांडली आहे, कारखान्याच्या  संचालक मंडळाची निवडणुक प्रक्रिया सुरु असल्याने विरोधक सभासदांमध्ये  संभ्रमावस्था निर्माण करु पाहत आहेत. मागील साडेचार वर्षात शेतकऱ्यांचे ऊस गाळप, कारखान्याचे हित, सभासदांच्या ऊस तोडणीस येणाऱ्या अडचणी याबाबत विरोधकांनी कधी चकार शब्द सुध्दा काढले नाहीत. उलट यापुर्वीही वित्तीय संस्थांकडून कर्ज उपलब्ध करुन घेताना त्या संस्थांना चुकीची माहिती देवून अर्थ सहाय्य मिळविण्यासाठी जाणीव पुर्वक अडथळे निर्माण करण्यात आले होते, असा आरोप काळे यांनी केला. 


कारखान्याच्या गेट समोर यापुर्वी कधीही कामगारांनी आंदोलने केली नाहीत. उलट संस्थेच्या अडचणीच्या काळात सर्व कामगारांनी संस्थेस चांगले सहकार्य केलेले आहे. मात्र जाणीव पुर्वक माझ्याच गावातील एखाद्या कामगारास चिथावणी देवून त्याला आंदोलनात उतरविले जात असेल तर त्यामागचा बोलविता धनी कोणी आहे हे ओळखणे इतपत सभासद अडाणी नाहीत. आंदोलनस्थळी सभासद व कामगारांची उपस्थिती नगण्य होती. सुज्ञ सभासद विरोधकांच्या जुमल्यास थारा देणार नाहीत, असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.


          निवडणुकीची आपणास कधीही भिती वाटत नाही, यापुर्वीही कारखान्याच्या निवडणुका झाल्या आहेत, त्यामध्ये सभासदांनी दिलेला कौल जनतेसमोर आहे. मात्र निवडणुकीच्या निमित्ताने संस्थेची बदनामी होत आहे, हे संस्थेच्या हितास बाधा आणणारे आहे, अशी खंत काळे यांनी व्यक्त केली. 

Leave a Reply

error: Content is protected !!