ऊस वाहतुकदारांना ही 13 टक्के दरवाढ
पंढरपूर : ईगल आय मीडिया
गळीत हंगाम 2021-22 मध्ये कारखान्याकडे ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना पहिली उचल 2 हजार रुपये आणि अंतिम दर प्रति टन 2 हजार 300 रुपये जाहीर केला आहे. पहिला हप्ता पंधरवडानुसार बिले देण्यात येणार असून, उर्वरित बिलाची रक्कम दोन टप्प्यात ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याच्या वतीने प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.
कारखान्याच्या संचालक मंडळाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, सध्याच्या ऊस वाहतूक दरामध्ये 13 टक्के दरवाढ करून पंधरवडा वाईज बिले अदा करण्यात येतील. सन 2020-21 मध्ये ज्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला आहे. त्यांची एफ आर पी प्रमाणे ऊस बिले शुक्रवार पासून संबंधितांचे बँक खात्यावर गटवार जमा करण्यात येणार आहेत.
तरी सर्व ऊस पुरवठादार शेतकरी व वाहतूकदार यांनी याची नोंद घेऊन सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याकडे गळीत हंगाम 2021-22 करिता जास्तीत जास्त ऊस गळीतास देवून सहकार्य करावे असे आवाहन, चेअरमन कल्याणराव काळे यांनी केले.